सौरव गांगुलीला तीन वर्षांचा ब्रेक घ्यावा लागणार, तर अजय शिर्केंना बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित राहण्यास मनाई

बीसीसीआय कार्यकारिणीत समाविष्ट होण्याचे अजय शिर्के यांचे सर्व मार्ग आता लोढा समितीने बंद केले आहेत. बीसीसीआयच्या बैठकीला अजय शिर्के यांना यापुढे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य म्हणून उपस्थित राहता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजय शिर्के यांच्या कारकिर्दीला आता जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. तर दुसऱया बाजूला बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सौरव गांगुलीची देखील लोढा समितीने ‘विकेट’ घेतली. सौरव गांगुलीचा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणून येत्या जून २०१७ पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे गांगुलीला पुढील तीन वर्ष ब्रेक घेणे बंधनकारक असल्याचा युक्तीवाद लोढा समितीने केला आहे. यापार्श्वभूमीवर गांगुलीला देखील क्रिकेट प्रशासनापासून पुढील तीन वर्षे दूर रहावे लागणार आहे. यासोबतच बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनेमध्ये एका सदस्याला जास्तीत जास्त ९ वर्षे संघटनेत काम करता येणार आहे. याआधी हा कालावधी १८ वर्षे होता. लोढा समितीच्या या निर्णयामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष बिश्वरुप डे यांचीही कारकीर्द संपुष्टात येईल. राज्य क्रीडा संघटनेतील बिश्वरुप यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ १० वर्षांचा झाला आहे. त्यामुळे बिश्वरुप यांनाही माघार घ्यावी लागणार आहे.

वाचा: सौरव गांगुलीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

 

बीसीसीआयच्या पदावरून हटविण्यात आलेला एखादा व्यक्ती बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित राहू शकतो का? किंवा अशी व्यक्ती बीसीसीआय किंवा क्रीडा संघटनेमध्ये कोणती भूमिका पार पाडू शकतो का? असे सवाल लोढा समितीला विचारण्यात आला होते. उत्तरात लोढा समितीने पदावरून हटविण्यात आलेला कोणताही व्यक्ती क्रिकेट प्रशासनाशी निगडीत कोणतेही काम करू शकत नाही, असे स्पष्ट केले. पदाधिकारीसोबतच तो व्यक्ती संघटनेचा सदस्य म्हणून देखील बाद झाला आहे. त्यामुळे अजय शिर्के बीसीसीआय किंवा राज्य क्रीडा संघटनेत कोणतीही भूमिका पार पाडू शकत नाहीत, असेही लोढा समितीने म्हटले आहे.

वाचा: गांगुलीला वगळल्याने रवी शास्त्रींवर मोहम्मद अझरुद्दीन भडकले