Ajinkya Rahane Record At Lords: भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अजिंक्य रहाणेने व्हिडिओ शेअर करून निवृत्ती घेत असल्याचा भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्य रहाणे हा कसोटी संघातील प्रमुख फलंदाज होता. पण ३ वर्षांपूर्वी तो संघातून बाहेर पडला आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक करू शकला नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पुनरागमाची संधी मिळाली नाही. अजिंक्य रहाणेने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. पण एक असा रेकॉर्ड आहे जो दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला देखील करता आलेला नाही.
अनेक भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी भारतात कसोटी क्रिकेट खेळताना दमदार कामगिरी केली आहे. पण परदेशात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पण अजिंक्य रहाणे हा असा एकमेव फलंदाज असावा, ज्याने मायदेशात खेळण्याच्या तुलनेत परदेशात चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.
क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला वाटतं की, त्याने आपल्या देशाची पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करून क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर फलंदाजी करावी आणि शतक करावं. पण हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. कारण क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला आणि किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना शतक झळकावता आलेलं नाही. पण अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली आहे. १७ जुलै २०१४ मध्ये झालेल्या सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघ दबावात होता. पण अजिंक्य रहाणेने जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडसारख्या गोलंदाजांचा सामना करून दमदार १०३ धावांची खेळी केली होती.
लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज
दिलीप वेंगसरकर -३ शतकं
केएल राहुल – २ शतकं
विनू मंकड – १ शतक
सौरव गांगुली – १ शतक
मोहम्मद अझरुद्दीन – १ शतक
गुंडप्पा विश्वनाथ – १ शतक
अजित आगरकर – १ शतक
राहुल द्रविड – १ शतक
अजिंक्य रहाणे – १ शतक
रवी शास्त्री – १ शतक
