खेळ मनं जोडतात असं म्हटलं जातं याचा प्रत्यय अजिंक्य रहाणेने अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीनंतर दाखवून दिला होता. २०१८ मध्ये अफगाणिस्तानचा भारतात कसोटी खेळण्यासाठी आला होता. बंगळुरू इथे झालेल्या कसोटीत भारतीय संघाने एक डाव आणि २६२ धावांनी प्रचंड विजय मिळवला. बलाढ्य भारतीय संघासमोर अफगाणिस्तान संघाने सपशेल शरणागतीच पत्करली.
सामन्यानंतर भारतीय संघाला जेतेपदाचा करंडक देण्यात आला. कर्णधार अजिंक्य रहाणेने करंडक स्वीकारला. भारतीय खेळाडू जेतेपदासह फोटो काढण्यासाठी जमले. त्याचवेळी अजिंक्यने बाजूला उभ्या असलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंना बोलावलं. अजिंक्यच्या सूचनेने ते भारावून गेले. अफगाणिस्तानचे सगळे खेळाडू जमले. दोन्ही संघ एकत्र आणि जेतेपदाचा करंडक असा फोटो काढण्यात आला. फोटोनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी तसंच त्यांच्या बोर्डानेही अजिंक्यच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं.
त्यावेळी अफगाणिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकत होता. अनुभव नसल्यामुळे विदेशात टेस्ट मॅच खेळणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार होतं. भारतात भारताविरुद्ध खेळणं एकतर्फी ठरणार हे स्पष्ट होतं. अफगाणिस्तानच्या बहुतांश क्रिकेटपटूंनी प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे अगदी रेफ्युजी कॅम्पमध्ये क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव अफगाणिस्तानमध्ये सामने होत नाहीत. त्यांचे बहुतांश खेळाडू दुबईत राहतात. जगभरात आयोजित होणाऱ्या टी२० लीगमध्ये खेळतात. अल्पावधीत अफगाणिस्तानने दमदार प्रदर्शनासह मोठ्या संघांना धक्का दिला आहे. त्यांच्याविरुद्ध सामना सहजी जिंकता येत नाही. हा सगळा संदर्भ लक्षात घेऊन अजिंक्यने सामना संपल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही फोटोसाठी बोलावलं.
एकमेव कसोटीत काय झालं?
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या मुकाबल्यात भारतीय संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुरली विजय आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने ४७४ धावांची मजल मारली. विजयने १०५ तर शिखरने १०७ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानतर्फे यामिन अहमझादीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. भारताच्या फिरकीसमोर अफगाणिस्तानची भंबेरी उडाली आणि त्यांचा डाव १०९ धावांतच आटोपला. रवीचंद्रन अश्विनने ४ तर इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
भारताने अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानची घसरगुंडी सुरूच राहिली. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने ४ तर उमेश यादवने ३ विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानचा दुसरा डाव १०३ धावांतच आटोपला. शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
