Ajinkya Rahane Statement on LSG vs KKR Win: कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुपर ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर सामना जिंकला आणि लखनौला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे. मोहम्मद शमी अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत सामना बरोबरीत आणला आणि त्यामुळे सुपर ओव्हर पाहायला मिळाली. केकेआरने यासह स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे काय म्हणाला, जाणून घेऊया.
केकेआरने प्रथम फलंदाजी करत रिंकू सिंहच्या खेळीच्या बळावर २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघही २० षटकांत १५५ धावा करण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने निकोलस पुरन व एडन मारक्रम यांन बाद करत दोन विकेट्स घेतल्या आणि केकेआरला विजयासाठी फक्त २ धावांचं आव्हान मिळालं. रिंकूने फलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर चौकार मारत संघाचा विजय निश्चित केला.
अजिंक्य रहाणेने कोणत्या खेळाडूला दिलं विजयाचं क्रेडिट?
अजिंक्य रहाणेला सामन्यानंतर त्याचे हृदयाचे ठोके कसे आहेत विचारताच म्हणाला, “आता सगळं स्थिर झालं आहे. या विजयामुळे खूप आनंद झाला. विशेषतः १६ षटकांनंतर आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यात रिंकूच्या खेळीने संपूर्ण सामना फिरवला. याचं पूर्ण श्रेय त्यालाच जातं खूपच शानदार खेळी होती. शेवटच्या षटकात त्याने धावा काढून गती मिळवून दिली, ते अप्रतिम होतं. आम्ही इथे सैयद मुश्ताक अली ट्रॉफी खेळलो होतो आणि पिचची मातीही तशीच होती. त्यामुळे १६०-१७० धावा चांगला स्कोअर ठरेल असं आम्हाला वाटलं. पण पॉवरप्लेमध्ये आमची कामगिरी खूपच खराब झाली हीच गोष्ट सुधारण्याची गरज आहे.”
KKRच्या विजयानंतर काय म्हणाला अजिंक्य रहाणे?
पुढे कॅप्टन म्हणाला, “१५६ धावांचा बचाव करताना, जर पॉवरप्ले चांगला झाला, तर आमचं गोलंदाजी आक्रमण खूप प्रभावी ठरतं. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यांच्यासाठी आनंद आहे. सामना शेवटपर्यंत संपलेला नसतो. लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. मधल्या षटकांत सुनील, वरुण आणि अनुकूल यांनी चांगलं काम केलं. आम्हाला माहिती होतं की एक विकेट सामना बदलू शकते.”
सुपर ओव्हरमध्ये नरेनला गोलंदाजी देण्याबद्दल अजिंक्य म्हणाला, “तोच पर्याय होता. तो सध्या खूप चांगली गोलंदाजी करत आहे. मोठ्या साईडला फिरकी गोलंदाजांना फटके मारणं सोपं नव्हतं. त्यागीनेही उत्तम कामगिरी केली त्याचा आत्मविश्वास आणि स्पष्टता खूप चांगली आहे. अनुकूलने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत उत्कृष्ट काम केलं. हे भारतीय खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. पण रिंकू सिंगच्या खेळीचं श्रेयस कमी करता येणार नाही.”
