भारताच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. अजिंक्य संघात असल्यावर तो चांगल्या धावा करणार हे आम्हाला माहिती होते आणि त्यामुळेच आम्हाला अतिरिक्त गोलंदाज खेळवता आला, असे मत कोहलीने सामन्यानंतर व्यक्त केले.

रहाणेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०३ धावांची खेळी साकारत संघाला तीनशे धावांचा टप्पा गाठण्यात मोलाची भूमिका वठवली होती.

‘अजिंक्य हा बऱ्याच कालावधीपासून भारतीय एकदिवसीय संघाचा सदस्य आहे. तो एक गुणवान खेळाडू असून त्याच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. संघातील तिसरा सलामीवीर म्हणून तो नेहमीच संघाचा एक भाग असतो. त्यामुळे फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी होत नसली तरी तो संघात असल्यामुळे आम्हाला आधार वाटतो. कारण मधल्या फळीतही अजिंक्यने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे फलंदाजीत कोणत्याही स्थानावर तो फलंदाजी करू शकतो. संघाला अजिंक्यसारख्याच खेळाडूंची गरज आहे,’ असे कोहलीने सामन्यानंतर सांगितले.

या विजयाबाबत कोहली म्हणाला की, ‘भारताचा हा परिपूर्ण विजय आहे. कारण फलंदाजांनी चोख कामगिरी करत मोठी धावसंख्या रचली आणि गोलंदाजांनी अचूक मारा करत वेस्ट इंडिजला कमी धावांमध्ये रोखले. त्यामुळे यापुढेही कामगिरीत सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.’