Ajinkya Rahane WTC 2023 Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात २९६ धावांपर्यंत मजल मारली. खरंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने १५१ धावांवर पाच गडी गमावले होते. भारतीय संघ अत्यंत बिकट परिस्थितीत असताना भारताचा मधल्या फळीतला स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे धुरंधर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. शुबमन गिल, एस. भरतही २० धावांचा टप्पा ओलांडू शकले नाहीत. रवींद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. परंतु भारतीय क्रिकेट संघ अत्यंत अडचणीत असताना अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूत ८९ धावांची खेळी साकारली. अजिंक्यच्या या खेळीला ११ चौकार आणि एका षटकाराचा साज लाभला. त्याने आधी जडेजाला साथीला घेत अर्धशतकी (७१) भागिदारी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरबरोबर १०९ धावांची भागिदारी रचत भारताला सावरलं. शार्दुल ठाकूनरे ५२ धावांची खेळी साकारत अजिंक्यला चांगली साथ दिली. दीड वर्षांपूर्वी फॉर्मशी झुंजत असलेल्या अजिंक्य रहाणेला भारतीय निवड समितीने संघातून वगळलं होतं. त्यापाठोपाठ २०२३-२४ च्या वार्षिक करारात अजिंक्यचा समावेश केला नाही. अजिंक्यचं क्रिकेट करीअर संपलं असं अनेकजण बोलू लागले होते. परंतु अजिंक्यने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून आपल्यात अजून बरंच क्रिकेट बाकी आहे हे दाखवून दिलं. अजिंक्यने आयपीएल २०२३ मध्ये १२ डावांमध्ये १७२.४९ च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावा फटकावल्या. अजिंक्यचं हे पुनरागमन पाहून त्याला भारतीय कसोटी संघात पुन्हा स्थान देण्यात आलं. परंतु आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात संधी दिली म्हणून अनेकांनी बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्वांची तोंडं अजिंक्यने काल बंद केली. ज्यांना वाटत होतं अजिक्यंचं करीअर संपलं त्यांनाही अजिंक्यने त्याच्या खेळीने प्रत्युत्तर दिलं. अजिंक्यने भारतीय संघाला मोठ्या संकटातून बाहेर काढल्यावर त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर अजिंक्यचं कौतुक होत असताना अजिंक्यची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री संयमी खेर हिनेही अजिंक्यची पाठ थोपटली आहे. संयमीने अजिंक्यच्या खेळीनंतर एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने लिहिलं आहे की, "कठीण काळ टिकत नाही. पण कठोर लोक टिकतात. अजिंक्य आणि त्याच्या या खेळीकडून जीवनाचे अनेक धडे शिकायला हवेत. अजिंक्य, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो." हे ही वाचा >> WTC Final IND vs AUS: “…पूर्णपणे तयार नव्हती”, ओव्हल खेळपट्टीबाबत शार्दुल ठाकूरचे धक्कादायक विधान अजिंक्यने या खेळीनंतर त्याच्या कसोटी क्रिकेटमधल्या ५,००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.