Ajinkya Rahane Message to BCCI Test Cricket Future: अजिंक्य रहाणेने एका वर्षाच्या आत अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या निवृत्तीबाबत नाराजी व्यक्त करत भारतीय संघ व्यवस्थापनाला स्पष्ट आणि कडक संदेश दिला आहे. कसोटी क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात बोलताना रहाणे म्हणाला की, या फॉरमॅटमध्ये सात-आठ अनुभवी खेळाडू आणि काही युवा क्रिकेटपटू असणं आवश्यक आहे. मात्र सध्याच्या भारतीय कसोटी संघात मोठ्या प्रमाणावर नवोदित खेळाडू दिसत आहेत.
रोहित शर्मा हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणारा पहिला वरिष्ठ खेळाडू ठरला. त्याने मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यात निवृत्ती जाहीर केली होती. काही दिवसांनंतर विराट कोहलीने सर्वात मोठ्या फॉरमॅटला अलविदा केलं. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर एका वर्षानंतर अजिंक्य रहाणेनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.
अजिंक्य रहाणेने बीसीसीआयला नेमका काय मेसेज दिला?
ओव्हरलॅप क्रिकेट या यूट्यूब चॅनलवर बोलताना रहाणे म्हणाला, “कसोटी क्रिकेटचे चाहते हे खऱ्या अर्थाने क्रिकेटप्रेमी असतात. गेल्या दोन वर्षांत अनेक नवीन खेळाडू कसोटी संघात आले आहेत. पण माझ्या मते कसोटी क्रिकेटमध्ये सात ते आठ वरिष्ठ खेळाडू आणि दोन-तीन युवा खेळाडू असणं गरजेचं आहे. सध्या मात्र संघात जवळपास सर्वच खेळाडू नवीन आहेत.”
तो पुढे म्हणाला, “संघात फारसे वरिष्ठ खेळाडू उरलेले नाहीत आणि कसोटी क्रिकेटला त्यांची गरज असते. वरिष्ठ खेळाडूंचा सन्मान केला पाहिजे. मला कसोटी क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात चिंता वाटते. विशेषतः भारतीय संघाबाबत चिंता सतावते. सर्व वरिष्ठ खेळाडू एकाच वेळी बाहेर पडणं ही मोठी समस्या ठरली आहे.”
सध्या भारताचा कसोटी कर्णधार असलेल्या शुबमन गिलने ४१ कसोटी सामने खेळले आहेत. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल हे संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर गेला असून, त्याच्या अनुपस्थितीत भारताचं वेगवान गोलंदाजी आक्रमण तुलनेने अनुभवहीन मानलं जात आहे.
अजिंक्य रहाणेची कारकीर्द
अजिंक्य रहाणेने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच मालिकेत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पहिला सामना खेळला. तर २०१३ मध्ये त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. २०१७ मध्ये रहाणेला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार नियुक्त करण्यात आलं आणि त्याने २०२१ पर्यंत विराट कोहलीसोबत नेतृत्वगटात महत्त्वाची भूमिका बजावली.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने अनेक वेळा भारतीय संघाचे नेतृत्व केलं. विशेषतः २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारतीय संघाला ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकाविजय मिळवून दिला, ज्यामुळे त्याचं नेतृत्व विशेष चर्चेत आलं. २०२२ मध्ये त्याला कसोटी संघातून वगळण्यात आलं. २०२३ मध्ये त्याने पुनरागमन केलं, मात्र त्यानंतर त्याला केवळ तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. रहाणेने आपल्या कसोटी कारकीर्दीत ८५ सामन्यांत ५०७७ धावा केल्या. त्याशिवाय त्याने ९० एकदिवसीय सामन्यांत २९६२ धावा, तर २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३७५ धावा केल्या.
