श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने बाजी मारली. या मालिकेनंतर भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडिया नवीन वर्षातल्या आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळेल. यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. मात्र वन-डे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे वन-डे संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अजिंक्य रहाणेचं नाव निवड समितीच्या बैठकीत चर्चेला आलं होतं. निवड समितीमधील एका महत्वाच्या सदस्याने अजिंक्यची वन-डे संघात निवड व्हावी अशी मागणी केली. ज्यामुळे वन-डे संघाची निवड लांबणीवर पडल्याचं समजतंय. अजिंक्य संघात पुनरागमन करेल की नाही याबद्दल अजुन कोणतीही अधिकृत माहिती नसली, तरीही आगामी काळात तो वन-डे संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. २०१८ साली भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य आपला अखेरचा वन-डे सामना खेळला होता.

२०१८ साली अजिंक्य आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन-डे सामना खेळला होता

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात वन-डे संघासाठी अजिंक्यची निवड होते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान सध्या भारत अ संघाकडून सराव सामने खेळण्यासाठी अजिंक्य न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला आहे.

अवश्य वाचा – रोहित शर्माला फलंदाजी करताना पाहणं ही एक पर्वणीच, माजी पाक खेळाडूने केलं कौतुक