Ajinkya Rahane announces retirement from international cricket love story : भारताचा उत्कृष्ट फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणेने २०११ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं सांगत, त्याने एका भावूक पोस्टद्वारे आपली निवृत्ती जाहीर केली. अजिंक्य रहाणेने या व्हीडिओमध्ये मराठीतदेखील बोलत त्याने चाहत्यांचे आभार मानले.

क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ट खेळी करत विक्रमांची रांग लावणाऱ्या अजिंक्य रहाणेला त्याची आयुष्याची साथीदार पत्नी राधिका धोपावकर कशी भेटली आणि त्यांची लव्हस्टोरी कशी होती हे जाणून घेऊया.

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांच्या लव्हस्टोरीची सुरूवात २००० च्या दशकातील मुंबईत झाली. जिथे चाळींमधील मुलं क्रिकेट आणि बॉलीवूड चित्रपटांबद्दल चर्चा करायची. अजिंक्य आणि राधिका मुंबईतील मुलुंड परिसरातील एकाच हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होते. राधिका ही अजिंक्यच्या बहिणीची जवळची मैत्रीण असल्याने, त्याचं अनेकदा भेटणं व्हायचं. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची मैत्री कॉलेजच्या काळात झाली. त्यावेळी राधिका ‘विनायक गणेश वाझे कॉलेज’मध्ये इंटिरियर डिझाइनचं शिक्षण घेत होती, तर अजिंक्य देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता.

अजिंक्य आणि राधिका यांची कुटुंबं एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्यामुळे, जेव्हा हे दोघे प्रेमात पडल्याचं कळताच त्यांच्या नात्यासाठी कुटुंबीयांकडून त्वरित हिरवा कंदील मिळाला. ही काही डेटिंग ॲपवर सुरू झालेली प्रेमकथा नव्हती; उलट, हे एक निखळ आणि सुंदर नातं होतं.

राधिका धोपावकर सोशल मीडियावर बऱ्याच लोकप्रिय आहेत आणि ३,३२,००० तिचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. राधिका आपला सर्वात मोठ्या आधारस्तंभ असल्याचं रहाणेने अनेकदा जाहीरपणे मान्य केलं आहे. २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विजयाकडे नेणं असो किंवा परदेशातील खेळपट्ट्यांवर ४० हून अधिकच्या सरासरीने धावा करणं असो; राधिकाचा शांत स्वभाव आणि तिनी दिलेली प्रेरणा या गोष्टी नेहमीच रहाणेच्या यशामागील मुख्य बळ ठरल्या आहेत, रहाणेनेही बरेचदा याचा उल्लेख केला आहे.

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांनी ७ वर्षे एकमेकांना डेट केलं आणि २६ सप्टेंबर २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. २०१९ मध्ये या जोडप्याला आर्या नावाची मुलगी झाली आणि ३ वर्षांनंतर २०२२ मध्ये लेकाचा जन्म झाला त्याचं नाव त्यांनी राघव असं ठेवलं.