Ajinkya Rahane Igatpuri Villa Raya Estate Inside Photos: भारताचा माजी खेळाडू व कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. यानंतर रहाणेने समालोचन क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान अजिंक्य रहाणे व त्याची पत्नी राधिका धोपावकर यांचा आलिशान व्हिला सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. इगतपुरीमधील आलिशान व्हिला नेमका कसा आहे आणि काय खासियत आहे, जाणून घेऊया.

अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर यांनी महाराष्ट्रातील इगतपुरीमध्ये असलेल्या त्यांच्या खासगी हॉलिडे व्हिलाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत आणि वैतरणा तलावाच्या नयनरम्य दृश्यासमोर असलेली ही वास्तू शहराच्या धावपळीपासून दूर कुटुंबासह निवांत वेळ घालवण्यासाठी उभारण्यात आली आहे. या व्हिलाची खास टूर StayVistaने YouTubeवर शेअर केलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळाली.

अजिंक्य रहाणेचा इगतपुरीतील व्हिला

‘राया इस्टेट’ असं या व्हिलाचं नाव आहे. पाच बेडरूम असलेल्या या व्हिलाची रचना रहाणे, राधिका आणि त्यांच्या मुलांसाठी खासगी सुट्टीचं ठिकाण म्हणून करण्यात आली आहे. चारही बाजूंनी डोंगर आणि हिरवाईने वेढलेल्या या ठिकाणाहून वैतरणा तलाव आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं मनमोहक दृश्य दिसतं. व्हिलामध्ये पाच किंग-साइज बेडरूम, इन्फिनिटी पूल, गॅझेबो आणि हिरव्यागार बागा आहेत. याशिवाय आसपासच्या निसर्गाचं दृश्य पाहता येईल अशा अनेक बाल्कनी, मुलांसाठी खास प्ले एरिया आणि घरातील बारची सुविधाही आहे.

कोरोनानंतर या घराचं बांधकाम करण्यात आलं. रहाणेने व्हिलची रचना करताना मोकळ्या जागा आणि उंचावलेल्या लिव्हिंग एरियाला प्राधान्य दिलं. या घराच्या डिझाइनमागे त्याच्या बालपणीच्या आठवणीही आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या घरी गेल्यावर तो बाहेर खेळण्यात बराच वेळ घालवायचा, त्याच आठवणींतून या घराच्या रचनेची प्रेरणा मिळाली.

अजिंक्य रहाणेला आपल्या मुलांसाठीही बालपणीच्या आठवणींसारखं वातावरण तयार करायचं होतं. मोकळ्या जागेत खेळता यावं आणि घराबाहेर वेळ घालवता यावा, यासाठी व्हिलामध्ये पुरेशी खुली जागा ठेवण्यात आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूसाठी हे हॉलिडे होम म्हणजे कुटुंबासह निवांत वेळ घालवण्याबरोबरच स्वतःला रिलॅक्स करण्याचंही ठिकाण आहे.

व्हिलाचा मुख्य लिव्हिंग रूम पहिल्या मजल्यावर उंचावलेल्या भागात आहे. त्याची दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एका भागात कुटुंबीय सकाळचा चहा किंवा कॉफी घेत वैतरणा तलाव आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दृश्य अनुभवतात. दुसरा भाग अधिक आरामदायी वातावरणासाठी तयार करण्यात आला आहे. तिथे आरामदायी सोफा असून दिवसभरात निवांत बसून वेळ घालवता येतो.

व्हिलाच्या इंटिरिअरमध्ये नैसर्गिक आणि मातीच्या रंगछटांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक बेडरूमला डोंगरांचं दृश्य दिसणारी प्रशस्त बाल्कनी आहे. रहाणे आणि राधिका सांगतात की, ते अनेकदा या बाल्कनीत तासन्‌तास बसून निसर्गाचा आनंद घेतात.

अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला समर्पित खास खोली

या व्हिलामधील सर्वात खास जागांपैकी एक म्हणजे रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला समर्पित असलेली खोली. या खोलीत क्रिकेटपटू म्हणून प्रवासातील अनेक आठवणी जपल्या आहेत. बॅट, बॉल, कॅप, संघाच्या जर्सी आणि सहकाऱ्यांबरोबरचे फोटो अशा अनेक वस्तू तिथे पाहायला मिळतात. या खोलीतील प्रत्येक वस्तू रहाणेच्या कारकिर्दीतील एका खास आठवणीशी जोडलेली आहे. रहाणेच्या म्हणण्यानुसार, ही संग्रहित आठवणी पुन्हा पाहणं त्याच्यासाठी भावनिक अनुभव असतो. तो म्हणतो की, या खोलीत प्रवेश करताच आजही त्याच्या अंगावर काटा येतो.