Ajinkya Rahane Ravi Shastri Mimicry Galle Test: भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती घेतल्यानंतर अजिंक्य रहाणेने एक नवी सुरूवात केली. त्याने कॉमेंट्रीमध्ये पदार्पण केलं आणि भारत-श्रीलंका सामन्यात तो समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. समालोचनादरम्यान अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींची नक्कल करताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अजिंक्य रहाणेने समालोचन कक्षात असताना भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची फिरकी घेतली. त्याने शास्त्रींची नक्कल केली आणि त्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रहाणे सध्या ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’साठी समालोचन करत आहे. भारत-श्रीलंका दोन्ही संघांमधील पहिला सामना गॉल येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी एक मजेशीर प्रसंग घडला, जेव्हा रहाणेने शास्त्रींच्या शैलीत समालोचन केलं; त्याच्या या मिमिक्रीने (नक्कल करण्याच्या शैलीने) चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान समालोचन करताना रहाणे खेळाविषयी चर्चा करताना दिसला. या प्रसंगी भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफही उपस्थित होता. अजिंक्य आणि शास्त्री यांनी एकमेकांसोबत जवळून काम केलं आहे; दोघेही मुंबईचे खेळाडू आहेत आणि रहाणे जेव्हा सक्रियपणे क्रिकेट खेळत होता, तेव्हा शास्त्री हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्याच्या नेतृत्वाखाली, ऑस्ट्रेलियातील २०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारतीय संघाने संस्मरणीय विजय मिळवला. त्या दौऱ्यातील पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला होता; त्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांत सर्वबाद झाला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत शास्त्री आणि रहाणे या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं होतं. आता, रहाणे शास्त्रींची हुबेहूब नक्कल करताना दिसत असून, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध गॉल कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पाचव्या दिवशी श्रीलंकेच्या संघाने पहिल्या सत्रात ६ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या आहेत. धनंजय डी सिल्वा व सोनल दिनुषा यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला होता. पण रवींद्र जडेजाने कर्णधाराला बाद करत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह आता भारताला विजयासाठी ४ विकेट्सची गरज असून श्रीलंकेला हा कसोटी सामना जिंकायचा असेल तर १९७ धावांची गरज आहे.
