Ajinkya Rahane Adelaide 36 All Out Virat Kohli Run Out Controversy: २०२० च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका अत्यंत नाट्यमय आणि दुर्दैवी म्हणून ओळखला जातो. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोसळली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज असहाय्य दिसले. एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेल्याने संपूर्ण भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताची ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिडा विश्वात मोठी निराशा पसरली होती. पण या कसोटीत संघ कसा ऑलआऊट झाला आणि नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा आता रहाणेने केला.

भारताच्या या मोठ्या पराभवानंतर आणि नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करू शकणार नाही, असा दावा अनेक दिग्गजांनी केला होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या पराभवानंतर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पुढील मेलबर्न कसोटीत विजय मिळवून संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आणि अखेर गाबा येथील अंतिम कसोटी जिंकून मालिका २-१ अशी ऐतिहासिकरीत्या आपल्या नावे केली. पण या मालिकेत संघ ३६ धावांवर सर्वबाद झाल्याचा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरला. दरम्यान नुकत्याच झालेल्या स्टिक टू क्रिकेट पोडकास्टमध्ये अजिंक्य रहाणेने या विषयावर वक्तव्य केलं.

अॅडलेड २०२० मध्ये विराट कोहलीसोबत झालेल्या त्या रनआऊटवेळी नेमकं काय घडलं होतं?

अजिंक्य रहाणे: “आम्ही सुमारे भागीदारी रचली होती आणि डाव आम्ही सावरला होता. मी नॅथन लायनचा चेंडू कव्हर-मिडऑफच्या दिशेने मारला आणि माझी पहिली प्रतिक्रिया होती, ‘YES!’ पण लगेच हेजलवूड वेगाने धावत येताना दिसला, त्यामुळे मी जोरात ‘NO!’ ओरडलो. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विराट अर्ध्या खेळपट्टीपर्यंत पोहोचला होता आणि हेजलवूडने त्याला रनआऊट केलं. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये अक्षरशः शांतता पसरली. मीही थोड्याच वेळात बाद झालो आणि आम्ही ३६ धावांवर कोसळलो!”

मेलबर्न कसोटीत कर्णधारपद स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगला तू कसा सामोरं गेलास?

अजिंक्य रहाणे: “विराट भारतात परतला होता, शमीला दुखापत झाली होती आणि ऑस्ट्रेलियाला वाटत होतं की आम्ही पूर्णपणे संपलो आहोत. पहिल्याच सत्रात स्टार्क, कमिन्स आणि हेजलवूड यांनी मला जोरदार स्लेजिंग केलं. त्यांची रणनीती विरोधी संघाच्या कर्णधाराचं मानसिक संतुलन बिघडवण्याची असते. माझी पद्धत होती, पूर्ण शांतता. मी एक शब्दही परत बोललो नाही. मी फक्त माझ्या रणनिती लिहून ठेवल्या, शतक झळकावलं आणि माझ्या बॅटला उत्तर देण्याची संधी दिली. डाव संपल्यानंतर त्यांच्या सर्व गोलंदाजांनी येऊन माझं अभिनंदन केलं.”

विराट कोहलीसोबतच्या ३६०० हून अधिक कसोटी धावांच्या भागीदारीचं गुपित काय होतं?

अजिंक्य रहाणे: “पूर्ण प्रामाणिकपणा आणि शून्य अहंकार! आम्ही दोघं स्वभावाने पूर्णपणे वेगळे होतो — तो अत्यंत उत्साही आणि उर्जावान, तर मी शांत. जेव्हा विराटला एखाद्या गोलंदाजाला प्रत्युत्तर द्यायचं असे, तेव्हा तो माझ्याकडे वळून विचारायचा, ‘जिंक्स, मी याला उत्तर देऊ का?’ मी फक्त एवढंच म्हणायचो, ‘जर त्यामुळे तू योग्य लयीत जाणार असशील, तर नक्की कर!’”