Ajinkya Rahane on Cameron green: मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात केकेआरचा ६ विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने ५ चेंडू राखून ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. केकेआरला स्पर्धेच्या सुरूवातीपूर्वीच गोलंदाजांच्या दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईविरूद्ध अननुभवी गोलंदाजी आक्रमणाचा संघाला फटका बसला. सामन्यानंतर बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत प्रश्नावर वैतागला.

केकेआरचे अनेक गोलंदाज स्पर्धेपूर्वीच संघातून बाहेर झाले. ज्यामध्ये गोलंदाज हर्षित राणा, आकाशदीप यांचा समावेश आहे. त्यामुळे संघाला बदली खेळाडूंचा पर्याय शोधावा लागला. ब्लेसिंग मुझरबानी पहिल्या सामन्यात खेळला, पण आपली छाप पाडू शकला नाही. तर अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याच्यावर संघाने २५ कोटी खर्च केले, तो प्लेईंग इलेव्हनचा भाग असला तरी गोलंदाजी मात्र करताना दिसला.

कॅमेरून ग्रीन का गोलंदाजी नाही करत आहे, हा प्रश्न विचारताच तो वैतागला आणि म्हणाला याचं कारण तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियालाच विचारा. याशिवाय सामन्यादरम्यान पायामध्ये प्रचंड क्रॅम्प्स येत असल्याने कर्णधार रहाणे मैदानाबाहेर गेला आणि रिंकू सिंहच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आली.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे त्याच्या दुखापतीबाबत म्हणाला, “ठीक वाटतंय, पण पोटरीमध्ये खूप क्रॅम्प्स आले, दोन्ही पायांमध्येच. आशा आहे लवकर ठीक होईल. माझ्या मते २२०-२२५ हा चांगला स्कोअर होता. आम्ही फलंदाजी खूप चांगली केली, पण आमचं गोलंदाजी आक्रमण अजून अनुभवहीन आहे. मुंबई इंडियन्ससारख्या मजबूत फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध खेळताना आमच्यासाठी हा शिकण्याचा टप्पा आहे. वैभव, कार्तिक आणि मुझारबानी सोडले तर बाकी अनेकांना आयपीएलचा अनुभव नाही. दोन अनुभवी फिरकीपटू आहेत, पण मुंबईने खूप चांगली फलंदाजी केली. आमचे गोलंदाज नक्कीच यातून शिकतील.

आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, मी अजूनही तरुणच आहे, ३७ वर्षांचा आहे (हसत), चांगलं वाटतंय, पण क्रॅम्प्समुळे थोडी अडचण झाली. मुंबईतील आर्द्रतेमुळे असं होतं. तरी सध्या मी ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याबद्दल आनंद आहे.

गोलंदाजी आक्रमणाबद्दल अजिंक्य म्हणाला, “ग्रीनच्या गोलंदाजी करण्याला हिरवा कंदील मिळाला तर आमचं कॉम्बिनेशन थोडं बदलेल. सध्या योग्य समतोल शोधणं महत्त्वाचं आहे, कोण चांगली गोलंदाजी करू शकतो, याचा विचार करावा लागतो. फलंदाजी चांगली झाली, पण गोलंदाजीत समतोल साधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ग्रीन लवकर गोलंदाजी करायला लागेल, अशी अपेक्षा आहे.” ग्रीन का गोलंदाजी करत नाहीये, असं विचारताच अजिंक्य म्हणाला, “हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारायला हवा.”

“फलंदाजीच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टी होत्या. मला वाटतं कार्तिकने चांगली गोलंदाजी केली, काही काळानंतर तो खेळला आणि छान कामगिरी केली. त्यामुळे हो, बऱ्याच सकारात्मक गोष्टी आहेत आणि अजून शिकायलाही खूप काही आहे,” असं अखेरीस कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला.