भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल एक तप भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रहाणेने अनेक संस्मरणीय खेळी केल्या. मात्र, या संयमी खेळाडूला अपेक्षित निरोप मिळाला नाही. रहाणेचे नेमके काय चुकले, असा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडला आहे. रहाणेसारख्या खेळाडूला निरोपाची कसोटी खेळण्याची संधीही मिळाली नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?

मुंबईकर क्रिकेटपटूची ‘खडूस’ वृत्ती

भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. तब्बल ४२ रणजी जेतेपदे पटकाविणाऱ्या या संघात स्थान मिळविणेही तितकेच आव्हानात्मक असते. अजित वाडेकर, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारखे दिग्गज याच मातीत घडले. असेच स्वप्न उराशी बाळगून रहाणे मुंबईच्या मैदानांवर मेहनत करू लागला. मूळचा डोंबिवलीचा असलेला रहाणे विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळू लागल्यानंतर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनामुळे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रहाणे तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम फलंदाज बनला.

अखेर २००६-०७ मध्ये त्याला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याच हंगामात त्याला १९ वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. पहिल्या हंगामात केवळ तीन सामने खेळल्यानंतर २००७-०८ मध्ये त्याने ४८७ धावा केल्या. पुढील हंगामात तब्बल १०८९ धावा करत मुंबईला ३८वे रणजी जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचे योगदान दिले. त्या हंगामात त्याच्यापेक्षा अधिक धावा केवळ वसीम जाफर (१२६०) यानेच केल्या होत्या.

२००९-१० मध्ये त्याने ८०९, तर २०१०-११ मध्ये ५१३ धावा करत सातत्य कायम राखले. अखेर २०११ मध्ये त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी भारताने २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. रहाणे आक्रमक फलंदाज नसला, तरी मुंबईकर क्रिकेटपटूची ‘खडूस’ वृत्ती त्याच्या फलंदाजीत स्पष्ट दिसत होती. त्याच स्वभावाचा भारताला पुढील अनेक वर्षे मोठा फायदा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संधी कमी झाल्यानंतर तो पुन्हा मुंबईकडे वळला आणि २०२३-२४ हंगामात संघाला ४२वे रणजी जेतेपद मिळवून देण्यातही त्याने मोलाची भूमिका बजावली.

परदेशात अधिक यश

रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यातून झाली. पदार्पणाच्या सामन्यात सलामीला येत त्याने ६१ धावांची खेळी केली. त्याच दौऱ्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. मात्र, कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला २०१३ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे झालेल्या कसोटीत त्याला संधी मिळाली, पण पहिल्या सामन्यात तो विशेष छाप पाडू शकला नाही. यानंतर मात्र रहाणे भारताचा भरवशाचा कसोटी फलंदाज ठरला. विशेषतः परदेशातील खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्याने आपल्या ८५ कसोटींपैकी ५१ सामने परदेशात खेळले आणि तेथे ३९.४३ च्या सरासरीने धावा केल्या. त्याच्या १२ कसोटी शतकांपैकी आठ शतके परदेशात आली. २०१४ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झळकावलेले शतक आजही संस्मरणीय मानले जाते. त्यापूर्वी डरबनमध्ये त्याने महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मेलबर्न, किंग्स्टन आणि कोलंबो येथेही त्याने शतके झळकावली.

डिसेंबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिल्ली कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावत त्याने विशेष कामगिरी केली. २०१७-१८ नंतर त्याच्या मोठ्या खेळींची संख्या कमी झाली आणि त्याला संघाबाहेरही बसावे लागले. मात्र, २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळताना मेलबर्नमध्ये त्याने शतक झळकावून भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर भारताने गॅबा येथे ऐतिहासिक विजय मिळवत मालिका जिंकली. २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातही तो भारताकडून खेळला. त्यानंतर त्याला केवळ दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. रहाणेने भारताचे सहा कसोटी सामन्यांत नेतृत्व केले. त्यापैकी चार सामने भारताने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले.

‘आयपीएल’मधील यश-अपयश

रहाणे २००८ पासून ‘आयपीएल’चा भाग राहिला. २००८ ते २०२६ या काळात त्याने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले. ‘आयपीएल’मध्ये त्याने २१२ सामने खेळताना ५३६७ धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद १०५ धावांची होती. राजस्थान रॉयल्सकडून तो सर्वाधिक काळ खेळला आणि त्या संघाचे नेतृत्वही केले. २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याला जेतेपदाचा आनंद अनुभवता आला. गेल्या दोन हंगामांत तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. मात्र, वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही पातळ्यांवर अपेक्षित कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. परिणामी त्याचे कर्णधारपदही गेले. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वेगवान शैलीत त्याच्या संथ फलंदाजीवर अनेकदा टीका झाली आणि त्याला सतत टीकेचा सामना करावा लागला.

सन्मानपूर्वक निवृत्ती नको का?

अजिंक्य रहाणे हा फार कमी बोलणारा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारा खेळाडू. संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची त्याची तयारी असायची. मात्र, २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडे पुन्हा कधीच वळून पाहिले नाही. अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष झाल्यानंतरही रहाणेला पुन्हा संधी मिळाली नाही. आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघात अनेक बदल झाले. ते स्वतः मुंबईचे असल्याने रहाणेला निरोपाची कसोटी देण्याबाबत कधी चर्चा झाली होती का, हा प्रश्नही उपस्थित होतो. ज्या खेळाडूने देशाची निस्वार्थ सेवा केली, अशा खेळाडूला अखेरची कसोटी खेळण्याची संधी मिळू नये, हे खटकणारे आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत चढ-उतार येतात.

कठीण काळात त्यांना संघ व्यवस्थापन आणि निवड समितीच्या विश्वासाची गरज असते. यापूर्वी अनेक खेळाडूंना फॉर्ममध्ये परतण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. रहाणेला तशी संधी मिळाली का, हा प्रश्न क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत. या सर्व चर्चांपासून रहाणे मात्र कायम दूर राहिला. शब्दांपेक्षा आपल्या फलंदाजीने उत्तर देणे, हाच त्याचा स्वभाव राहिला. आज कसोटी क्रिकेट अधिक वेगवान झाले असले, तरी भारताला परदेशात सातत्याने यश मिळवायचे असेल, तर रहाणेसारख्या संयमी, तंत्रशुद्ध आणि संघासाठी झटणाऱ्या फलंदाजांची उणीव भविष्यात निश्चितच जाणवेल.