‘मी देशासाठी सर्वतोपरी योगदान दिलं. मी नेहमीच सच्चेपणाने खेळलो. भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली पर्वाचा मला भाग होता आलं याचा आनंद आणि समाधान आहे. मी खेळणं थांबवत असलो तरी खेळाप्रति योगदान देतच राहीन. मुंबई क्रिकेटने मला घडवलं. माझे आईबाबा, पत्नी आणि मुलं सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले. मी ही वाटचाल करू शकलो कारण तुमचं प्रेम’, हे बोलताना अजिंक्य गहिवरला. ‘तुम्ही कधीच परकं मानलं नाहीत, सदैव साथ दिलीत’, सांगताना अजिंक्यला अश्रू आवरले नाहीत. भारतीय संघाचा माजी कर्णधार, मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्यने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
अजिंक्यने ८५ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. डोंबिवली ते मुंबई असा लोकल ट्रेनने प्रवास करून क्रिकेटची धुळाक्षरं गिरवणाऱ्या अजिंक्यने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. दिग्गजांच्या उपस्थितीमुळे प्रदीर्घ काळ राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागलेल्या अजिंक्यने संधी मिळाल्यानंतर आपली ताकद दाखवून दिली. भारतीय संघासाठी मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज झाला. विराट कोहलीचा विश्वासू साथीदार असलेल्या अजिंक्यच्या नेतृत्वातच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर जेतेपदावर नाव कोरलं. शांत, संयमी आणि शिस्तबद्ध अजिंक्यने नेहमीच संघहिताला प्राधान्य दिलं.
‘डोंबिवलीतून मुंबईत लोकलने येत क्रिकेट खेळणाऱ्या त्या मुलाचं देशासाठी खेळायचं स्वप्न पूर्ण झालं. भारतासाठी खेळणं हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद असे. बीसीसीआय, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि सहकारी खेळाडू यांच्या ठोस पाठिंब्यामुळेच भारतासाठी नियमितपणे खेळू शकलो. प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि शेवटही असतो. माझ्यासाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं पण थांबण्याची हीच योग्य वेळ आहे. बॅटिंग करताना मी टायमिंगला नेहमीच महत्त्व दिलं’, असं अजिंक्य म्हणाला.
