Ajinkya Rahane retires from international cricket why called Jinx: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमधील तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रहाणे भारतासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता; तो संघातून जवळपास बाहेरच पडला होता आणि आता त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर भावुक व्हीडिओ शेअर करत रहाणेने निवृत्तीची घोषणा केली होती. अजिंक्य रहाणेला क्रिकेटच्या मैदानावर जिंक्स नाव कसं पडलं, हे जाणून घेऊया.
मुंबईचा स्टायलिश उजव्या हाताचा फलंदाज अजिंक्य रहाणे हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि सामना फिरवणारा खेळाडू ठरला. शांत स्वभाव, संयमी फलंदाजी आणि दबावाच्या क्षणी संघाला सावरण्याच्या क्षमतेमुळे त्याने भारतीय संघात वेगळी ओळख निर्माण केली. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर रहाणेने भारताच्या अनेक ऐतिहासिक कसोटी विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला. विशेषतः नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळताना त्याने आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडली. २०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियात भारताला मिळवून दिलेला ऐतिहासिक मालिका विजय हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय आणि सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलेला क्षण मानला जातो.
अजिंक्य रहाणेला ‘जिंक्स’ हे टोपणनाव कसं पडलं?
मैदानावर संयमी स्वभाव, प्रामाणिक खेळ आणि खेळाडूवृत्तीसाठी ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे सहकारी खेळाडू आणि प्रतिस्पर्ध्यांमध्येही तितकाच आदराचा मानकरी आहे. मात्र, क्रिकेटविश्वात तो ‘जिंक्स’ या टोपणनावानेही प्रसिद्ध आहे. हे नाव त्याला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने दिलं होतं. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वॉर्नला ‘अजिंक्य’ हे नाव उच्चारायला अडचण येत होती. त्यामुळे त्याने रहाणेला ‘जिंक्स’ अशी हाक मारण्यास सुरुवात केली आणि पुढे हेच नाव त्याची ओळख बनलं.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळताना ३८.५६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतकं आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना अनेक कठीण प्रसंगी त्याने भारताचा डाव सावरला आणि संघाला संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय त्याने ९० एकदिवसीय सामन्यांत २,९६२ धावा करत ३ शतकं आणि २४ अर्धशतकं झळकावली. तर २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ११३.२९ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत भारताचं प्रतिनिधित्व केलं.
