Ajinkya Rahane On MS Dhoni: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वत खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर आता अजिंक्य रहाणेने देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. रहाणेने भावुक व्हिडीओ शेअर करुन क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. दरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

रहाणेने अॅलेस्टर कुक आणि मायकल वॉन यांच्या स्टीक टू क्रिकेट या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान त्याने अनेक किस्से सांगितले. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल एक सिक्रेटही सांगितलं आहे. रहाणेने धोनीच्या नेतृत्वात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यामुळे दोघांनाही एकत्र क्रिकेट खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. यादरम्यान रहाणेने धोनीचा एक किस्सा सांगितला.

एमएस धोनीबद्दल बोलताना रहाणे म्हणाला, “तो सर्वांसारखाच अतिशय सामान्य माणूस आहे. हे अगदी खरं आहे की, हॉटेलमध्ये त्याच्या रुमचा दरवाजा २४ तास उघडा असायचा. जर दरवाजा उघडा असेल, तर कोणीही आत येऊन क्रिकेटवर चर्चा करु शकतं, गप्पा मारु शकतं किंवा मग निवांत वेळ घालवू शकतं. हे सांगण्याची ही त्याची एक सुक्ष्म पद्धत होती.”

तसेचच तो पुढे म्हणाला की, “कधी कधी त्याच्या खोलीत १० ते १५ लोक असायचे, तर काही वेळा संपूर्ण संघच त्याच्या रुममध्ये जमायचा. पण जेव्हा दरवाचा बंद असायचा, तेव्हा कोणालाही आत येण्याची परवानगी नसायची. कारण दरवाजा बंद म्हणजे एसएस धोनीच्या झोपण्याची वेळ.”

अजिंक्य रहाणेने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याला भारतीय संघासाठी ८० हून अधिक कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ५००० हून अधिक धावा केल्या. यादरम्यान त्याच्या नावे १२ शतकं आणि २५ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. मायदेशात खेळताना तो हव्या तितक्या धावा करु शकला नाही. पण परदेशात त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये फलंदाजी करताना रहाणेचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. रहाणेच्या नावे लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावण्याची नोंद आहे. यासह विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, रहाणेच्या नेतृत्वातख खेळताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला, ऑस्ट्रेलियात पराभूत करुन बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.