Ajinkya Rahane recalls 2020 Australia Test series 36 all out: भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने २०२० मध्ये विराट कोहलीकडून भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद स्वीकारतानाचा अनुभव सांगितला आहे. अ‍ॅडलेड कसोटीत भारतीय संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारताना आपण प्रचंड दबावाखाली होतो, असा खुलासा रहाणेने केला. मात्र, आपली घालमेल इतरांना जाणवू नये, यासाठी आपण सर्वांसमोर आत्मविश्वास असल्याचा आव आणला होता, असंही त्याने सांगितलं.

२०२०-२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना पहिल्याच कसोटी सामन्यात भारताची अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली. अ‍ॅडलेड कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांत सर्वबाद झाला. ही भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आणि भारतीय संघाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला.

ऑस्ट्रेलियाविरद्धच्या या पराभवानंतर भारतीय संघासमोर मोठं आव्हान उभे राहिलं होतं. मात्र, अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. अ‍ॅडलेड कसोटीनंतर उर्वरित मालिकेसाठी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलं. त्यानंतर त्याने भारतीय संघाला आपल्या नेतृत्त्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना रहाणेने त्या कठीण प्रसंगाची आठवण सांगितली. तो म्हणाला, “अ‍ॅडलेडमध्ये सामना गमावल्यानंतर माझ्या मनात एक गोष्ट सतत येत होती. प्रत्येकजण बोलत होता की भारताचा ४-० असा पराभव होईल आणि भारतीय संघाला मालिका जिंकण्याची कोणतीही संधी नाही.”

रहाणे पुढे म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी घाबरलो होतो. मी प्रामाणिकपणे सांगतोय. पण खेळाडू म्हणून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या काळात माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे सहकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाचा आव आणणं, ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोरही तसंच वागणं आणि प्रसारमाध्यमांसमोरही आपली घालमेल दिसू न देणं.”

रहाणे म्हणाला, “मला आठवतंय, मी माझ्या सहकारी खेळाडूंशी बोलताना म्हणालो होतो की, आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्याला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना भारताकडून खेळायचं आहे. पण कधीकधी आपल्या कारकिर्दीत नशिबाचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे आपण अशा खेळाडूंसाठी खेळलं पाहिजे, ज्यांना कधीच भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच, भविष्यात भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंसाठीही आपण आपलं सर्वोत्तम योगदान दिलं पाहिजे.”