Ajinkya Rahane Yashasvi Jaiswal Sledging Controversy: अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बराच काळ मुंबई संघाचं नेतृत्त्व केलं आहे. २०२२ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये एक घटना चांगलीच गाजली होती. अजिंक्य रहाणेने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात संघाचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल याला मैदानाबाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं. रहाणेने यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढल्याचा व्हीडिओ आणि ते प्रकरण चांगलंच चर्चेत होता. पण अजिंक्यने हा निर्णय यशस्वीच्या भल्यासाठी घेतला होता. त्या प्रकरणाचा आता स्वत: अजिंक्य रहाणेने खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेट वर्तुळात अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांच्यातील संबंध हा बऱ्याच काळापासून चर्चेचा आणि तर्कवितर्कांचा विषय राहिला आहे. एका बाजूला भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आणि मुंबईला अनेकदा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार म्हणून रहाणे आहे, तर दुसऱ्या बाजूला सध्याचा क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा यशस्वी जैस्वाल आहे. रहाणेने २०२२ च्या दुलीप करंडक (Duleep Trophy) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील एका घटनेबद्दल भाष्य केलं, ज्यामध्ये त्याने जैस्वालला मैदानाबाहेर पाठवलं होतं; त्याच्या मते, या कठोर निर्णयामुळेच जैस्वालवर येणारी चार सामन्यांची बंदी टळली होती.
२०२२ च्या दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, यशस्वी जैस्वालने ‘साउथ झोन’चा खेळाडू टी. रवी तेजा याला वारंवार स्लेजिंग केल्यामुळे वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याला मैदानाबाहेर पाठवलं होतं. पंचांनी दिलेल्या सूचनांनंतरही हा प्रश्न न सुटल्याने रहाणेने हे कठोर पाऊल उचललं. त्यावेळी जैस्वाल सातत्याने रवी तेजाला स्लेज करण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे सामन्यातील वातावरण तापलं होतं. फलंदाजाकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर रहाणेने ही कारवाई केली; ही घटना चांगलीच चर्चेत आली होती.
अजिंक्य रहाणेचा यशस्वी जैस्वालला २०२२मध्ये मैदानाबाहेर काढण्याबाबत मोठा खुलासा
द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रहाणे म्हणाला, “स्लेजिंग हा खेळाचा भाग आहे आणि ते व्हायलाच हवं, कारण त्यामुळे थोडी रंगत वाढते. पण त्या वेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे मला जाणवलं. हो, त्या क्षणी यशस्वीला वाईट वाटलं असेल. मात्र आपण अशा अनेक घटना पाहिल्या आहेत जिथे खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. वेळ कधी कसा बदलतो सांगता येत नाही. एक संधी गेली की संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. मला जाणवलं की दोन्ही खेळाडू अतिरेक करत होते आणि माझ्या सहकाऱ्याला शांत करणं ही माझी जबाबदारी होती.”
रहाणेने पुढे मोठा खुलासा करत सांगितलं, “सामनाधिकारी चार सामन्यांच्या बंदी घालण्याच्या शिक्षेसह तयार होते, पत्रही तयार झालं होतं. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘हे पत्र आहे, पण तू जे केलंस त्यामुळे मी ते फाडून टाकतो.’ त्यांनी माझ्यासमोर ते पत्र फाडलं.” तो पुढे म्हणाला, “शेवटी मला आनंद झाला की जैस्वालवर कोणतीही बंदी आली नाही आणि आज तो भारतासाठी खेळतो आहे. काय घडलं असतं सांगता येत नाही. कदाचित त्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नसती, कदाचित मिळाली असती. तो अत्यंत दर्जेदार खेळाडू आहे, त्याच्या श्रेयात मी कुठलाही वाटा घेत नाही. पण आयुष्यात पुढे काय होईल हे कुणालाच माहीत नसतं.”
