Ajinkya Rahane Podcast Virat Kohli Ravi Shastri Era Test Cricket: अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी क्रिकेटमधील एक अत्यंत विश्वासू आणि तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. मध्यक्रमात फलंदाजी करताना त्याने अनेकदा भारतीय संघाचा डाव सावरला आहे. विदेशी संघांच्या मैदानांवर, विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या आव्हानात्मक परिस्थितींमध्ये त्याचा खेळ नेहमीच उठून दिसला. टीम इंडियाच्या याच स्टार खेळाडूने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर त्याने एका खास पोडकास्टमध्ये हजेरी लावली होती आणि त्यादरम्यान त्याने विराट-शास्त्री यांच्या काळात भारताची कसोटीतील कामगिरी कशी बदलली हे सांगितलं.
अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सुवर्ण पर्वाला पूर्णविराम दिला. अजिंक्यच्या या निवृत्तीनंतर त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर त्याने क्रिकेटमधील दिग्गजांच्या एका पोडकास्टमध्ये हजेरी लावली होती. अॅलिस्टर कुक, मायकेल वॉ, डेव्हिड लॉयड यांच्या स्टिक टू क्रिकेट या पोडकास्टमध्ये अजिंक्य रहाणेने त्याच्या कारकिर्दीतील अनेक विषयांवर भाष्य केलं.
कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाचा चेहरामोहरा कसा बदलला यावर अजिंक्य रहाणेने या पोडकास्टदरम्यान वक्तव्य केलं. अजिंक्य रहाणे म्हणाला, “एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी भारतीय संघात पूर्णपणे वेगळी मानसिकता आणली. त्यांचा भर निर्भय आणि आक्रमक क्रिकेट खेळण्यावर होता, विशेषतः विदेशातील कठीण परिस्थितीत त्यांनी ही मानसिकता आणायची होती. आम्ही बचावात्मक विचार करणं थांबवलं आणि सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सुरू केला.”
“विराटची तीव्रता आणि माझा शांत स्वभाव एकमेकांना चांगला पूरक ठरला. आमच्यातील खुल्या आणि प्रामाणिक संवादामुळे आम्हाला अनेक महत्त्वाच्या भागीदाऱ्या उभारता आल्या. विराट नेहमी खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य देत असे. तो मला सांगायचा, ‘पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांविरूद्ध आक्रमक फटकेबाजी करू शकतोस असं वाटत असेल, तर नक्की कर.’ त्याच्या त्या विश्वासामुळे आम्हाला कोणतीही भीती न बाळगता स्वतःचा खेळ मोकळेपणाने खेळण्याचा आत्मविश्वास मिळाला,” असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
लॉर्ड्सच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नावे शतक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रहाणेने त्याच्या कसोटी पदार्पणात २०१४ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर ही शतकी खेळी केली होती. अजिंक्यने १५४ चेंडूत १०३ धावा करत शतक साकारलं होतं. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने ९५ धावांनी विजय नोंदवला होता.Ajinkya Rahane Podcast Virat Kohli Ravi Shastri Era Test Cricket:
८० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या रहाणेने ५,००० हून अधिक धावा केल्या असून त्यात १२ शतकं आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. दबावाच्या क्षणी संयम ठेवून संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच त्याला ‘संकटमोचक’ म्हणून ओळखलं जातं. भारतीय कसोटी क्रिकेटच्या आधुनिक इतिहासात अजिंक्य रहाणेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे.
