करोना विषाणूमुळे सध्या देशभरात चिंतेचं वातावरण आहे. दररोज देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे या काळात सध्या सर्व भारतीय खेळाडू घरात राहून आपल्या परिवाराला वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही आपल्या घरात थांबून मुलगी आर्या आणि पत्नी राधिकासोबत वेळ घालवतोय. मंगळवारी सोशल मीडियावर अजिंक्य रहाणेने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारायचं ठरवत, क्रिकेटसंदर्भात प्रश्न विचारण्यास सांगितलं. यावर एका चाहत्याने तुझा क्वारंटाइन काळातला दिनक्रम काय असतो असा प्रश्न विचारला, ज्याला अजिंक्यने चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं.

नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी मालिकेत अजिंक्यला अपेक्षित कामगिरी करता आलेली नव्हती. मर्यादीत षटकांच्या सामन्यात अजिंक्य आपलं संघातलं स्थान गमावून बसला आहे. आयपीएलमध्ये तेराव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने अजिंक्यची निवड केली होती. दरम्यान, मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्या काळात आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यासाठी आशिया चषक ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी बीसीसीआयला मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. सध्याच्या घडीला देशभरात महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत…त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सरकारी यंत्रणांना कधी यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.