Ajinkya Rahane On KKR Defeat: कोलकाता नाईट रायडर्स संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाज फ्लॉप ठरले होते. आता आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने फ्लॉप फलंदाजीमुळे सामना गमावला आहे. हा सामना ६५ धावांनी गमावल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. पण हवा तसा शेवट करता आला नाही. सामना झाल्यानंतर बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “आमच्या फलंदाजांनी मोठी पार्टनरशिप केली. ते सेट झाले होते, पण त्यांनी डाव पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर आम्ही शेवटच्या ७-८ षटकात दमदार पुनरागमन केलं. सुरुवातीच्या १० षटकात ते १३०-१४० धावांच्या जवळ पोहोचले होते, पण त्यानंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “धावांचा पाठलाग करत असताना मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं असतं. दुसऱ्या डावात चेंडू थोडा थांबून येत होता. पहिल्या डावाच्या तुलनेत स्लो चेंडू जास्त ग्रीप होत होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होईल, असं वाटलं होतं पण चेंडू थांबून येत होता.”
कोलकाता नाईट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर खेळताना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबाबत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “नक्कीच घरच्या मैदानावर विजय मिळवणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आम्हाला आता पुन्हा एकदा विचार करावा लागेल. टीम कॉम्बिनेशनवर लक्ष द्यावं लागेल. जर गोलंदाजीमध्ये बदल करून एक जास्तीचा फलंदाज घेता आला, तर त्याबद्दलही विचार करावा लागेल.”
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ६ गडी बाद २२६ धावा केल्या होत्या. २२७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने ३५ धावा केल्या. अजिंक्य रहाणे अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. तर फिन ॲलेनने २८ धावा केल्या. पण कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संपूर्ण डाव १६१ धावांवर आटोपला.
