spt05तिरंगी स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवरून विश्वचषकासंदर्भात भाष्य करणे योग्य ठरणार नाही. चार कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्यानंतर लगेचच एकदिवसीय स्पर्धा झाली. कसोटी मालिकेतील दमलेले खेळाडूच एकदिवसीय स्पध्रेतही खेळत आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हाच भारतीय संघ विश्वचषकाचे जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज असेल. यष्टिरक्षकासह सहा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज हे समीकरण योग्य वाटते आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांचे स्वरूप लक्षात घेता स्टुअर्ट बिन्नीला अंतिम संघात संधी मिळावी असे मला वाटते. फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. ढासळता फॉर्म आणि दुखापती या दोघांना बाजूला सारत सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचे आव्हान गोलंदाजांसमोर आहे. विराट कोहली फलंदाजीतील आकर्षण असले तरी अजिंक्य रहाणे विश्वचषकात किमयागार ठरू शकतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर टीका होत असली तरी विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत थंड डोक्याने निर्णय घेऊ शकणारा कर्णधार अत्यावश्यक आहे. तिरंगी मालिकेनंतर प्रशिक्षक आणि कर्णधाराला रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. अन्य संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अनुभव आणि युवा दोन्ही पातळ्यांवर संतुलित आहे. ए बी डी’व्हिलियर्स, हशीम अमला, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल जबरदस्त फॉर्मात आहेत. मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ ही प्रतिमा बाजूला सारत इतिहास घडवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सक्षम असल्याचे जाणवते. घरच्या मैदानावर खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाही जेतेपदाचा दावेदार आहे. मात्र सातत्याचा अभाव आणि दुखापती यामुळे त्यांचे अभियान कमकुवत झाले आहे. मात्र त्यांची पुनरामगन करण्याची क्षमता विलक्षण आहे. स्टीव्हन स्मिथचा फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरू शकतो. गेल्या वर्षभरात न्यूझीलंडने अफलातून कामगिरी केली आहे. क्षमता आणि गुणवत्ता असूनही न्यूझीलंडचा संघ जेतेपदापासून दूर राहिला आहे. मात्र सर्वसमावेशक स्वरूपामुळे न्यूझीलंडचा संघ यंदा चमत्कार घडवू शकतो. ब्रेंडन मॅक्क्युलम झंझावाती फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेचा संघ सातत्याने अंतिम लढतीपर्यंत पोहोचतो, मात्र सलग दोनदा त्यांचे जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले आहे. यंदा हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या अनुभवी वीरांना जेतेपदाची भेट देण्याचा संघाचा प्रयत्न असेल. कर्णधारपद स्वीकारल्यापासून अँजेलो मॅथ्यूज सर्वच आघाडय़ांवर सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहे. विश्वचषकात त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अमाप गुणवत्ता आहे. मात्र बेशिस्त आणि बेभरवशी खेळामुळे या दोन्ही संघाबद्दल काहीही ठोस सांगता येत नाही. मात्र विशिष्ट दिवशी ते कोणत्याही संघाचा भरधाव वारू रोखू शकतात. प्रत्येक विश्वचषकात काही नव्या गोष्टी पाहायला मिळतात. नवीन नियमांनंतर एकदिवसीय लढतींचे स्वरूप पालटले आहे, त्यादृष्टीने काही अनोखी समीकरणे अंगीकारण्याचा संघ विचार करू शकतात. आधीच्या विश्वचषकांप्रमाणे यंदा या महासोहळ्याच्या निमित्ताने दर्जेदार खेळाची पर्वणी मिळेल हे निश्चित!
सुलक्षण कुलकर्णी-माजी क्रिकेटपटू
शब्दांकन : पराग फाटक