ऑस्ट्रेलियाविरुद्धची धरमशाला कसोटी ८ विकेट्सने जिंकून भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली. रांची कसोटीत विराट कोहलीला दुखापत झाल्याने धरमशाला कसोटीत भारतीय संघाच्या नेतृत्तवाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कसोटी विश्वात भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची अजिंक्य रहाणेची ही पहिलीच वेळ होती. रहाणेने आपल्या पहिल्याच कर्णधारी कसोटीत विजय प्राप्त करून दिला. संघाचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत विजय प्राप्त करणारा रहाणे नववा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीने आपल्या पहिल्याच कर्णधारी कसोटीत संघाला विजय प्राप्त करून दिला होता.

कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या १०६ धावांच्या कमकुवत आव्हानाचा पाठलाग करताना मुरली विजय(८), तर चेतेश्वर पुजारा(०) स्वस्तात बाद झाले होते. अशावेळी रहाणेने मैदानात उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता अगदी पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरूवात केली. रहाणेने मैदानात उभे राहून कर्णधारी खेळी साकारली आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. रहाणेने दोन खणखणीत षटकार आणि चार चौकारांच्या जोरावर केवळ २७ चेंडूत ३८ धावांची खेळी साकारली.
दुसरीकडे या कसोटी मालिकेत फॉर्मात असलेला भारताचा सलामीवीर केएल राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. राहुलने ७६ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या.

पहिल्याच कसोटीत विजय मिळवणारे भारतीय कर्णधार-

पॉल उम्रीगर , सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे