Ajinkya Rahane wedding story wife Radhika Dhopavkar reaction: भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज अजिंक्य रहाणेने निवृत्तीची घोषणा केली. फलंदाजीबरोबरच नेतृत्त्वातही उत्कृष्ट रेकॉर्ड नावे असणाऱ्या अजिंक्यच्या निवृत्तीने अजून एका पर्वाचा अंत झाला. अजूनही भारतासाठी खेळण्याची इच्छा आहे म्हणणाऱ्या अजिंक्यने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अजिंक्यच्या या कारकिर्दीत त्याला त्याची पत्नी राधिका धोपावकर हिने चांगली साथ दिली. दरम्यान अजिंक्य आणि राधिकाच्या लग्नातील एक मजेशीर किस्सा सध्या चर्चेत आला आहे.

अजिंक्य क्रिकेट मैदानावर जितका शांत संयमी आहे, तसाच स्वभाव त्याचा मैदानाबाहेरदेखील आहे. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकरची लव्हस्टोरी तर आपल्याला माहीत आहे, अजिंक्य आणि राधिका यांनी ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली होती. पण अजिंक्य स्वत:च्या लग्नातच टीशर्ट आणि जीन्स घालून पोहोचला होता. हे पाहताच राधिका संतापली होती.

अजिंक्य आणि राधिका यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघेही बालपणीचे मित्र होते. राधिका ही अजिंक्यच्या बहिणीची मैत्रिण होती, कॉलेजच्या दिवसांमध्ये हे दोघेही चांगले मित्र बनले. या मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं. जवळपास ७ वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं. त्यादरम्यान २०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारतासाठी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणानंतर तीन वर्षांनी या दोघांनी लग्न केलं. दोघांची कुटुंब एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असल्याने त्यांच्या लग्नाला लगेच मंजुरी मिळाली.

अजिंक्य रहाणे स्वत:च्या लग्नाला घरचं साधं टीशर्ट आणि जीन्स घालून पोहोचला होता. रहाणेने एका मुलाखतीत स्वत: याचा उल्लेख केला होता. अजिंक्य पिवळ्या रंगाचं टीशर्ट आणि जीन्स घालून लग्नाला पोहोचला होता. लग्नानंतर अनेक वर्षांनी अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकर हिने त्यांच्या लग्नातील एक मजेशीर आठवण सांगितली होती. स्वतःच्या लग्नात अजिंक्य अगदी साध्या वेशात आल्यामुळे तिला त्यावेळी खूप राग आला होता, असं तिने हसत-हसत सांगितलं. राधिका म्हणाली, “अजिंक्य रहाणे खूपच शांत स्वभावाचा आहे. स्वतःच्या लग्नातही तो फक्त पिवळा टी-शर्ट आणि जीन्स घालून आला होता. मला त्यावेळी खूप राग आला होता, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं.”

अजिंक्य रहाणे व राधिका धोपावकर यांनी २०१४ मध्ये लग्न केलं आणि आता दोघेही एकमेकांना चांगली साथ देत सुखाचा संसार करत आहेत. दोघांनी दोन मुलं आहेत, मुलीचं नाव आर्या तर मुलाचं नाव राघव असं आहे.