वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाली आहे. आगरकर यांनी करारवाढीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) विचारणा केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र, यात तथ्य नसल्याचे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले असून अद्याप आगरकर यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

आगरकर यांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. आपल्याला पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत करारवाढ मिळावी अशी आगरकर यांनी ‘बीसीसीआय’ला विनंती केल्याची चर्चा होती. परंतु ही केवळ चर्चा असून यात खरे काहीच नाही, असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

‘‘निवड समिती ही ‘बीसीसीआय’ची एक उपसमिती आहे. निवडकर्त्यांशी सप्टेंबरपर्यंतचा करार करण्यात आला आहे. आगरकरही त्याचा भाग आहेत. सप्टेंबरनंतर काय करायचे, पुढील वर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आगरकर यांनी आपले काम सुरू ठेवावे की नाही, याचा निर्णय ‘बीसीसीआय’चे सचिव (देवजित सैकिया) आणि आगरकर यांना मिळून घ्यावा लागेल. घटनेनुसार, एखादा वरिष्ठ निवडकर्ता जास्तीतजास्त चार वर्षांपर्यंत आपल्या पदावर कायम राहू शकतो आणि त्यासाठी त्याला मुदतवाढीची मागणी करण्याची आवश्यकता नसते,’’ असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकार्‍याने नमूद केले.

पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आगरकर यांची जुलै २०२३ मध्ये राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी संघनिवडीबाबत अनेक महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेन्टी-२० आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आगरकर यांच्या निवड समितीला नव्याने संघबांधणी करावी लागली.

कसोटी संघ अजूनही संक्रमणावस्थेत आहे. ट्वेन्टी-२० संघाने मात्र ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आगरकर यांच्या समितीने निवडलेल्या भारतीय संघाने २०२४ आणि २०२६ असे सलग दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकत इतिहास घडवला. अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव संघ आहे.

‘एकदिवसीय’ खेळाडूंवर ‘आयपीएल’मध्ये लक्ष

’ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अजून दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असला,

तरी भारताच्या निवड समितीने संभाव्य २० खेळाडूंची यादी तयार केली आहे.

’ आगामी ‘आयपीएल’ स्पर्धेत

या खेळाडूंची कामगिरी आणि तंदुरुस्ती यावर राष्ट्रीय निवड समितीचे पाच सदस्य बारीक लक्ष ठेवणार असल्याचे समजते. निवड सदस्य काही सामन्यांसाठी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित राहतील, तर अन्य सामने टीव्हीवरून पाहतील.

’ ‘आयपीएल’ला २८ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्तपणे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे रंगणार आहे.