Ajit Agarkar on Virat Kohli Retirement From Test Cricket : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा चौथा हंगाम सुरू होणार असून या हंगामात भारतीय क्रिकेट संघ सर्वप्रथम इंग्लंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. उभयं संघांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २० जून रोजी दोन्ही संघांत पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. या मालिकेसाठी शनिवारी (२४ मे) भारतीय संघ जाहीर करण्यात आला. युवा खेळाडू शुबमन गिल या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार असून रिषभ पंत उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल.

या मालिकेआधी भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. यापैकी विराट कोहली सध्या ३६ वर्षांचा असून पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहे. तो फॉर्ममध्ये देखील परतला आहे. तरी त्याने अचानक निवृत्ती का घेतली असा प्रश्न क्रिकेट रसिकांना सतावतोय. यावर अखेर निवड समितीने मौन सोडलं आहे. भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर निवड समितीला याबाबत विचारल्यानंतर समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

विराटच्या निवृत्तीबाबत अजित आगरकर काय म्हणाले?

विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. भारताने २०२४ च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. त्यावेळी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराटने केवळ एक शतक झळकावलं होतं. त्यामुळे संघातील विराटच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली, पाठोपाठ १२ मे रोजी विराटने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली. या निवृत्तीबाबत अजित आगरकर म्हणाले, “विराटने एप्रिल महिन्यातच निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याने मे महिन्यात त्याचा निर्णय जाहीर केला”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव.

भारत विरुद्ध इंग्लंड २०२५ कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स
  • दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
  • चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन