BCCI Selection Committee Ajit Agarkar Replacement News: भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. यानंतर अजित आगरकर यांना या पदावरून हटवले जाऊ शकते, अशी बातमी सध्या समोर येत आहे. जूनमध्ये मिळालेल्या तीन महिन्यांच्या मुदतवाढीनंतरचा हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. सुरुवातीला अशी चर्चा होती की, पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून बीसीसीआय आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबरनंतरही वाढवेल; मात्र, इंग्लंड दौऱ्यादरम्यान घडलेल्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर, त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपण्याची दाट शक्यता आहे.

‘दैनिक जागरण’च्या एका वृत्तानुसार, बीसीसीआयचे काही अधिकारी आगरकर यांच्या जागी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची निवड समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली. त्यामुळे आगरकरांचा कार्यकाळ संपणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्माच्या भारताच्या वनडे संघातील भवितव्याभोवती निर्माण झालेल्या चर्चांमुळे हा निर्णय घेण्यात असल्याचा दावा रिपोर्टमध्ये केला जात आहे. इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका ही रोहितची अखेरची मालिका ठरेल, असं वृत्त समोर आलं होतं. दैनिक जागरणच्या अहवालानुसार, आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील टीम मॅनेजमेंटशी पुढील मालिकांमधून रोहितला वगळण्याबाबत चर्चा देखील केली होती.

रोहित शर्माच्या कोणत्या प्रकरणामुळे अजित आगरकरचं पद धोक्यात?

दरम्यान, लॉर्ड्सवरील भारत-इंग्लंड तिसरा वनडे सामना रोहितचा अखेरचा सामना असेल, अशी बातमी समोर आली. मात्र त्या निर्णायक सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावलं आणि त्यामुळे निवडकर्ते तसेच टीम मॅनेजमेंट दोघेही अडचणीत सापडल्याची चर्चा सुरू झाली. तिसऱ्या वनडेपूर्वी ही माहिती समोर आल्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी निवेदन जारी केलं. विशेष म्हणजे, हे निवेदन मुख्य निवडकर्ते आगरकर यांच्याशी चर्चा न करताच दिल्याचं बोललं जात आहे. सैकिया यांनी स्पष्ट केलं की, रोहित जोपर्यंत संघाच्या योजनांचा भाग आहे, तोपर्यंत तो भारताचं प्रतिनिधित्व करत राहील.

याशिवाय, भारतीय संघातील कारभार पाहणाऱ्या काही वरिष्ठ मंडळींना रोहित शर्माने २०२७ चा वनडे विश्वचषक खेळू नये, अशी भूमिका असल्याचं वृत्तही समोर आलं आहे. दरम्यान, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील दहा सामन्यांपैकी आठ पराभवांचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआयने बैठक आयोजित केली होती. मात्र, ही बैठक अद्याप झालेली नाही. इंग्लंड दौरा संपल्यानंतर ही बैठक होणार होती, परंतु आढावा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत रवाना झाला आहे.