राजकारणाप्रमाणे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र पवार नावाने व्यापलेले  होते.  शरद पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनी देखील आपल्या संघटनकौशल्याने क्रीडा क्षेत्रावरही आपली छाप सोडली होती. राजकारणाइतकाच अजित पवार यांचा क्रीडा क्षेत्रातही सहज वावर होता. आपल्या व्यग्र कार्यक्रमातून अजित पवार यांनी कायम खेळासाठी वेळ काढला. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) माध्यमातून त्यांनी राज्यातील खेळाच्या विकासाची कास कायम धरली होती. राज्य खो-खो आणि कबड्डी संघटनेसह त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली.

खेळाच्या विकासाबरोबरच खेळाडू हा अजित पवार यांच्यासाठी नाजूक विषय होता. खेळाडूंना काही कमी पडू नये यासाठी ते कायम तत्पर असायचे. खेळासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीपासून खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यापर्यंत निर्णय घेताना अजित पवार यांनी कधीही वेळ घेतला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार्‍या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्यापासून ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रमकेत वाढ करण्याचे निर्णय त्यांनी असेच काही क्षणात घेतले. दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सोहळा सुरू असताना व्यासपीठावरून खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत वाढ होण्याची विनंती करण्यात आली.

 तेव्हा सोहळ्यात उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी तातडीने खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हा निर्णय पुढील वर्षापासून नव्हे, तर चालू तसेच मागील तीन वर्षांपासून लागू करण्यात येईल अशी घोषणा केली. त्यानुसार २०२० ते २०२३ मधील पुरस्कार विजेत्यांच्या खात्यात वाढीव पारितोषिक रक्कम शासनाच्या वतीने जमा करण्यात आली. त्याचबरोबर शासकीय सेवेत खेळाडूंसाठी पाच टक्के राखीव जागा ठेवण्याचा निर्णय देखील अजित पवार यांनी घेतला होता. यामुळे अजित पवार राज्यातील प्रत्येक खेळाडूच्या गळ्यातील ताईत बनले होते.

आपण कुठल्या संघटनेवर आहोत की नाही याचा कधीही त्यांनी विचार केला नाही. अडचणी घेऊन समोर आलेल्या प्रत्येक खेळाडूला त्यांनी कधीही नाराज केले नाही. क्रीडा क्षेत्रातील अशा धाडसी निर्णयांमुळे त्यांच्यावर कायम टीका झाली. पण, त्याकडे कायम दुर्लक्ष करून अजित पवार यांनी क्रीडा क्षेत्रासाठी आपले काम कधीही थांबवले नाही. राज्यात ऑलिम्पिक भवन व्हावे हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यानुसार त्यांनी ते प्रत्यक्षात उतरविण्यास सुरुवातही केली होती. निर्णयशैली आणि खेळाडूंच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या शैलीमुळे अजित पवार यांना क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू कधीही विसरणार नाही