२००८ मध्ये आयपीएल स्पर्धा सुरू झाली. त्याच्या काही महिने आधी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या युवा संघाने U19 वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. याच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अजितेश अरगल सामनावीर होता. आफ्रिकेच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर खेळताना भारताचा डाव १५९ धावांतच आटोपला होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेला १०३ धावाच करता आल्या. अजितेशने ५ षटकांपैकी २ षटकं निर्धाव टाकत अवघ्या ७ धावात २ विकेट्स पटकावल्या होत्या. २०२६ आयपीएल स्पर्धेचा हंगाम ऐन भरात आहे. त्या संघातील विराट कोहली आणि रवींद्र जडेजा अजूनही तितक्याच उत्साहाने खेळत आहेत. अजितेशही या स्पर्धेत आहे पण त्याची भूमिका बदलली आहे. बुधवारी झालेल्या लखनौ-राजस्थान लढतीत अजितेशने आयपीएल पदार्पण केलं. १८ वर्षांपूर्वी ज्याच्याबरोबर वर्ल्डकप जिंकला त्या रवींद्र जडेजाचं बॉस होण्याचं भाग्य अजितेशने कष्टाने कमावलं आहे.
वर्ल्डकपनंतर अजितेश आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघासाठी खेळला. मात्र त्याला कधीही अंतिम अकरात खेळायची संधी मिळाली नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बडोद्याचं प्रतिनिधित्व करताना त्याने १० प्रथम श्रेणी सामने, ६ टी२० सामने आणि ३ लिस्ट ए सामने खेळताना २९ विकेट्स पटकावल्या. २०१५ मध्ये तो शेवटचं खेळला. खेळणं थांबवल्यानंतर अजितेश अंपायरिंगकडे वळला. बीसीसीआयची अंपायरिंग प्रक्रिया पार करत त्याने इथवर वाटचाल केली आहे. प्रथम श्रेणी सामने, लिस्ट ए सामने, टी२० सामने असे करत अजितेश आयपीएलपर्यंत पोहोचला आहे. यंदाच्या वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत अजितेशने अंपायरिंग पदार्पण केलं होतं.
अजितेश आयकर विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहे. खेळाडू कोट्यातून त्याची या पदी नियुक्ती झाली होती.
U19 वर्ल्डकप स्पर्धेत चमकलेले अनेक खेळाडू नंतर गायबच होतात. त्या वर्ल्डकप संघातील विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे टीम इंडियाचा अविभाज्य भाग झाले. कोहली तर आधुनिक क्रिकेटच्या शिलेदारांपैकी एक झाला. सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. भारताचा तिन्ही प्रकारातील कर्णधार झाला. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा विराटच्याच नावावर आहेत. गेल्या वर्षी आयपीएल जेतेपदाचं विराटचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. जडेजाने सर्वांगीण अष्टपैलू खेळाच्या बळावर दमदार वाटचाल केली. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात जडेजाने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं.
आयपीएल स्पर्धेतही जडेजाच्या नावाचा दबदबा आहे. या संघातील मनीष पांडे भारतासाठी खेळला. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम मनीषच्या नावावर आहे. आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये मनीषचा समावेश होतो. या संघातील सौरभ तिवारी धोनीचा वारसदार असं म्हटलं गेलं. आयपीएलमध्ये त्याने चुणूक दाखवली पण नंतर त्याचा प्रवास थांबला. सौरभ आज झारखंड क्रिकेट संघटनेचा पदाधिकारी आहे. या संघातील इक्बाल अब्दुल्ला, प्रदीप संगवान, सिद्धार्थ कौल आयपीएल स्पर्धेत खेळले. याच संघातील तन्मय श्रीवास्तव हाही अंपायर झाला आहे. श्रीवास्तव याने बीसीसीआयचा कोचिंग (लेव्हल२) अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
