MI Owner Akash Ambani Left stadium in midway of match: मुंबई इंडियन्स आणि सीएसके यांच्यातील हायव्होल्टेज लढत वानखेडेच्या मैदानावर पाहायला मिळाली. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या साधारण कामगिरीचा त्यांना चांगलाच फटका बसला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा तब्बल १०३ धावांनी दारूण पराभव केला. मुंबईचा संपूर्ण संघ या सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला, तर फलंदाजांनी पूर्णपणे निराशा करत संघ १०४ धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यादरम्यानचा आकाश अंबानींचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

एकतर्फी झालेल्या या सामन्यात, मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी सामना संपण्यापूर्वीच स्टेडियम सोडताना दिसले. संघाच्या पुनरागमनाच्या आशा मावळताना दिसताच आकाश अंबानी उठून थेट निघून गेले. चेन्नईच्या प्रभावी कामगिरीसमोर मुंबईची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती, ज्यातून घरच्या संघातील वाढती निराशा स्पष्ट जाणवत होती.

मुंबई इंडियन्ससाठी चेन्नईविरूद्ध सामन्याचा दिवस फारच वाईट ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स कधीच सामन्यावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत आणि मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे सीएसकेने एक भव्य विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सचा कोणताच फलंदाज फार वेळ मैदानावर टिकू शकला नाही.

आकाश अंबानींचा पारा चढला अन् मुंबईची अवस्था पाहून निघून गेले मैदानाबाहेर

मुंबईने पॉवरप्लेमधील सलग ३ षटकांत ३ विकेट्स गमावल्या. यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी साकारत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिलक वर्माला अकील हुसैनने क्लीन बोल्ड केलं. तर काही वेळाने सूर्यकुमार यादव ३६ धावा करत झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव बाद होताच आकाश अंबानी थेट आपल्या जागेवरून उठले आणि चाहत्यांनाही उठून निघून जाण्याचे त्यांनी हातवारे केले.

आकाश अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या डगआऊटकडे कटाक्ष टाकला आणि काही न बोलताच झटकन निघून गेले. पुढे जातानाही त्यांनी चाहत्यांना स्टेडियमबाहेर पडा, सामना सोडून निघा असे हातवारे केले. आकाश अंबानींच्या या कृतीचा व्हीडिओ सर्वत्र सध्या व्हायरल होत आहे. आकाश अंबानी नेहमीच स्टँड्समध्ये उपस्थित राहून आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसतात आणि वर्षानुवर्षे संघाच्या प्रवासाशी ते जवळून जोडलेले आहेत. पण हा मोठा पराभव आणि सामना संपण्याआधीच त्यांचा निघून जाण्याचा निर्णय या दोन्ही गोष्टींनी मुंबई इंडियन्ससाठी हा दिवस किती निराशाजनक ठरला, हे स्पष्ट करणार होतं.