Rohit Sharma Akash Madhwal Viral Video: आयपीएलच्या १९व्या सीझनला आज म्हणजेच २८ मार्च २०२६ पासून सुरूवात आहे. सर्व संघ यंदाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. स्पर्धेतील पहिलाच सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. पण तत्त्पूर्वी रोहित शर्मा आणि आकाश मधवाल यांच्या व्हीडिओ सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर आकाश मधवालच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ मधील त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेमध्ये सराव करत आहे. मुंबई आणि केकेआर यांच्यातील पहिलाच सामना वानखेडेच्या मैदानावर होणार आहे. रोहित शर्मासह सर्व सहकाऱ्यांचे सराव करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण आकाश मधवालने रोहित शर्माला पाहताच हात जोडत दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आकाश मधवाल रोहित शर्माचा काळीज जिंकणारा व्हीडिओ
रोहित शर्मा सरावासाठी मैदानावर उतरतो. दरम्यान या व्हीडिओमध्ये सुरूवातीला आकाश मधवाल गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याच्या हातात चेंडू धरून तो उभा होता, तितक्यात रोहित शर्मा चालत त्याच्याजवळ पोहोचतो. रोहित शर्माला पाहताच आकाश लगेच हात जोडतो. रोहितही एक हात पुढे करून त्याच्या दिशेने पुढे चालत जातो. त्यानंतर रोहित जवळ येताच आकाश छातीवर हात ठेवून खाली वाकून त्याला अभिवादन करतो.
आकाशच्या कृतीने मनं जिंकलेली असताना रोहित शर्मादेखील आकाशच्या खांद्यावर हात टाकत अगदी मित्राप्रमाणे चालत त्याच्याशी संवाद साधत असतो. दोघेही त्यांच्या हावभावावरून क्रिकेटविषयी चर्चा करताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आकाश मधवाल रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्समध्ये खेळला आहे. आकाशने रोहितच्या नेतृत्त्वात २०२३ मध्ये पदार्पण केलं होतं. आकाशने २०२३ मध्ये लखनौविरूद्ध सामन्यात ३.३ षटकांत अवघ्या ५ धावा देत ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
आकाश मधवालला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर रोहित-मधवालच्या या व्हीडिओने चाहतेही भावुक झाले. आकाश रिप्लेसमेंट आहे का की नेट बॉलर, या प्रश्नांचा भडीमार चाहत्यांनी केला आहे. तर मुंबई इंडियन्समध्ये आकाश मधवालला परत आणल्याबद्दल चाहत्यांनी फ्रँचायझीचे आभारदेखील मानले आहेत. तर हा व्हीडिओ पाहून २०२३ आयपीएलची आठवण झाल्याचं देखील चाहते म्हणाले.
आकाश मधवालला यानंतर मुंबई इंडियन्सने २०२४ मध्ये रिलीज केलं आणि २०२५ च्या आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघाने त्याची निवड केली. तर २०२६ च्या सीझनपूर्वी राजस्थाननेही त्याला रिलीज केलं. आयपीएल २०२६ च्य लिलावात आकाश मधवाल अनसोल्ड राहिला. यानंतर आता तो मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं की तो मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराहचा रिप्लेसमेंट असेल. पण आकाश मधवाल हा संघात सपोर्ट बॉलर म्हणून असल्याचं मुंबई इंडियन्सने पोस्टच्या कमेंट्समध्ये सांगितलं आहे. तर जसप्रीत बुमराह आगामी सीझनसाठी संघात सामील झाला आहे.
