Akash Singh Celebration: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील ५९ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लखनौच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. लखनौकडून आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या आकाश सिंगने चेन्नईच्या ३ प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गेल्या सामन्यात जेव्हा चेन्नई आणि लखनौ हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी लखनौचे गोलंदाज संघर्ष करताना दिसून आले होते. पण या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या आकाश सिंगने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ६.५ च्या इकॉनॉमिने अवघ्या २३ धावा खर्च केल्या आणि ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.
आकाश सिंगचं भन्नाट सेलिब्रेशन
या हंगामातील आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या आकाश सिंगला संधी मिळाली, त्याने या संधीचं सोनं केलं. त्याने चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला निकोलस पूरनच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनला मुकूल चौधरीच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या उर्विल पटेलला अवघ्या ६ धावांवर मिचेल मार्शच्या हातून झेलबाद करुन माघारी धाडलं. तिन्ही वेळेस त्याने एकसारखंच सेलिब्रेशन केलं. त्याने आपल्या खिशातून चिठ्ठी काढली आणि जोरदार सेलिब्रेशन केलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोनूसार या चिठ्ठीत, “अक्की ऑन फायर… टी-२० क्रिकेटमध्ये विकेट कशी घ्यायची हे आकाशला चांगलंच माहीत आहे…”असं लिहिलं आहे.
पावरप्लेमध्ये चेन्नईची फ्लॉप सुरुवात
या सामन्यात चेन्नईला हवी तशी सुरुवात करता आली नाही. गेल्या सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी लखनौने पावरप्लेमध्ये वेगवान सुरुवात केली होती. पण या सामन्यात असं काहीच झालं नाही. पावरप्लेमध्ये चेन्नईला २ गडी बाद अवघ्या ३७ धावा करता आल्या. पण चेन्नईला २ मोठे धक्के बसले. आधी ऋतुराज गायकवाड अवघ्या १३ धावांवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन २० धावांवर बाद झाला.
