Akashdeep Dedicate His Performance to Sister: भारतीय संघाने बर्मिंगहमचं चक्रव्यूह भेदत ५८ वर्षांत पहिल्यांदाच या मैदानावर विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३३६ धावांनी मोठा पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. फलंदाजी विभागात शुबमन गिलने उत्कृष्ट कामगिरी करत एकट्याने ४३० धावा केल्या. तर आकाशदीपने पहिल्या सामन्यात १० विकेट्स घेतल्या. आकाशदीपने सामन्यानंतर बोलताना या सामन्यातील कामगिरीचं १० विकेट्सचं त्याने कोणाला श्रेय दिलं ते सांगितलं आहे.
आकाशदीपला बुमराहच्या जागी संघात संधी मिळाली होती. जसप्रीत बुमराह वर्कलोडमुळे दुसरा कसोटी सामना खेळत नव्हता. त्यामुळे आकाशदीपला संधी मिळाली. आकाशने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत १० विकेट्स एका कसोटीत घेतल्या. यानंतर चेतन शर्मा यांच्यानंतर इंग्लंडमध्ये १० विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.
आकाशदीपने पहिल्या डावात हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केलेला चेंडू आणि दुसऱ्या डावात जो रूटला त्रिफळाचीत केलेले चेंडू कमाल होते. जो रूटची विकेट घेणाऱ्या चेंडूचं तर सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. आकाशदीपचं खूप कौतुक होत असलं तरी आतमधून मात्र आकाशदीप थोडा दु:खात आहे. त्याची सख्खी बहिण सध्या कर्करोगाशी झुंज देतेय.
आकाशदीपने सामन्यानंतर चेतेश्वर पुजारासह बोलताना याचा खुलासा केला. आकाशदीपने दुसऱ्या कसोटीतील कामगिरी आणि १० विकेट्स त्याच्या बहिणीला समर्पित केले आहेत. त्याची बहिण गेल्या २ महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. चेतेश्वर पुजाराशी बोलताना आकाशदीप म्हणाला, “माझी बहिण गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देतेय. आता ती ठिक आहे आणि मला अशी कामगिरी करताना पाहून आज तिला खूप आनंद होत असेल. मी आजचा सामना आणि माझी कामगिरी बहिणीला समर्पित करतो.”
पुजाराने त्याला म्हटलं की बहिणीसाठी इथून काय मेसेज देशील, तेव्हा आकाशदीप म्हणाला, “मी आज जे खेळलोय ते फक्त तुझ्यासाठी खेळलोय. ही कामगिरी तुझ्यासाठी आहे. मी सामन्यात जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी चेंडू पकडत होतो. तेव्हा तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. या प्रवासात आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत.”