IPL 2026 Kolkata Knight Riders: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआर संघाला दुखापतींचा जबर फटका बसला आहे. आयपीएलला अवघे काही दिवस शिल्लक असताना केकेआरचे खेळाडू एकामागून एक स्पर्धेबाहेर होत आहेत. हर्षित राणानंतर, अजून एक वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर झाला आहे. या खेळाडूला केकेआरने एक कोटींना ताफ्यात सामील केलं होतं. मथिशा पाथिराना देखील फिटनेसला हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजीला आक्रमणाला जणू नजर लागली आहे. मुस्तफिजूर रहमानला बीसीसीआयच्या गाईडलाईन्समुळे संघाबाहेर करावं लागलं. यानंतर १८ कोटी खर्चून संघाता घेतलेला मथिशा पथिराना दुखापतीमुळे त्रस्त आहे. याशिवाय हर्षित राणाला दुखापत झाल्याने तो स्पर्धेबाहेर आहे. तर आता संघाचा २९ वर्षीय भारतीय गोलंदाज आकाशदीप स्पर्धेबाहेर झाला आहे.
क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आकाशदीपला आयपीएल २०२६ मधून माघार घेतल्याची माहिती दिली. “दुर्दैवाने, १८ मार्चपासून कोलकातामध्ये सुरू असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या शिबिरात आकाशदीप सामील झालेला नाही. अशी माहिती मिळत आहे की बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) रिहॅबिलिटेशन उपचार घेत आहे. पण, त्याच्या दुखापतीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. असं म्हटलं जाकंय की CoE ने खेळाडूच्या संदर्भात फ्रँचायझीसोबत काही चर्चा केली आहे. तो संभाव्यतः संपूर्ण हंगामासाठी आयपीएलमधून बाहेर आहे.”
आकाशदीपच्या कारकिर्दीl दुखापतींमुळे अडथळा आला आहे. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने चार हंगामांमध्ये केवळ १४ सामने खेळून १० बळी घेतले आहेत. गेल्या आयपीएलमध्ये तो लखनौ सुपरजायंट्स संघाचा भाग होता, ज्यांनी त्याला २०२५ च्या लिलावात ८ कोटी रुपयांना करारबद्ध केलं होतं. परंतु केवळ एका हंगामानंतर त्याला संघातून रिलीज केलं.
एका बाजूला केकेआरच्या गोलंदाजी आक्रमणाची चिंता भेडसावत असताना फलंदाजी विभाग मात्र मजबूत दिसत आहे. सराव सामन्यात अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंह, टीम सेफर्ट यांनी चांगली कामगिरी केली. अंगक्रिश रघुवंशीने तर शतकी खेळी केली. याशिवाय गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ३ विकेट्स घेत संघासाठी या दुखापतींच्या सत्रात तो आशेचा किरण ठरला आहे.
