भारताने २०१६-१७ या कालावधीत मायदेशात आणि परदेशात खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी एकूण ३ कसोटी सामने हे फिक्स असल्याचा दावा अल जझीरा या वृत्तवाहिनीने केला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका ही गॉल येथील कसोटी (जुलै २०१७), भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही रांची येथील कसोटी (मार्च २०१७) आणि भारत विरुद्ध इंग्लंड ही चेन्नईला झालेली कसोटी (डिसेंबर २०१६) या तीनही कसोटी फिक्स असल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीतून हा दावा करण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की आयसीसीने याबाबत आधीच चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याची चौकशी सुरु आहे. त्याची चौकशी पूर्ण होऊन आधी आयसीसीने मॉरिसला दोषी ठरवू देत. आयसीसीच्या निर्णयाची प्रत हाती आल्यावरच बीबीसीसीआय या संदर्भात कारवाई करेल.

मॉरिसचे नाव हे संशयितांच्या यादीत आहे का? हेदेखील आम्हाला आमच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीकडून माहिती करून घ्यावे लागेल. तसेच मॉरिस हा बीसीसीआय किंवा राज्य क्रिकेट संघटनांच्या प्रकल्पाशी संबंधित नाही किंवा त्याच्याकडे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्याला त्याच्या पदावरून हटवण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मॉरिसला केवळ बीसीसीआयकडून माजी खेळाडू या नात्याने दरमहा २२ हजार ५०० रुपयांचे पेन्शन देण्यात येते. जर आयसीसीच्या चौकशीत आणि तपासात मॉरिस दोषी आढळला, तर त्याचे ते पेन्शन बीसीसीआय बंद करेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसने खेळपट्टीबाबत झालेल्या ‘फिक्सिंग’मध्ये आपला हात असल्याची कबुली दिली आहे. खेळपट्टी तयार करणाऱ्यांच्या साहाय्याने हा प्रकार घडला असल्याचे त्याने म्हटले आहे.

‘‘आम्हाला यापूर्वीच ही माहिती कळली असून संबंधित देशांमधील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या सदस्यांमार्फत आम्ही सखोल चौकशी करीत आहोत. खेळपट्टी तयार करणाऱ्यांची चौकशी सुरू झाली असून सर्व पुरावे मिळवण्याचाही आम्ही प्रयत्न करीत आहोत,’’ असे आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीचे सरव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी सांगितले आहे.