पहिल्या ३ कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेवर कब्जा केलेला असला तरीही इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला चांगली लढत देतो आहे. मेलबर्न येथे खेळवण्यात येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने पहिल्या डावात २४४ धावांची नाबाद खेळी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये कुक आपल्या फॉर्मात नव्हता. मागील ५ कसोटी आणि १० डावांमध्ये मिळून कुकने अवघ्या १४४ धावा काढल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या खेळीत अॅलिस्टर कुकने अनेक विक्रम आपल्या नावावर केले तर काही विक्रमांची बरोबरीही केली. कुकने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पाचही महत्वाच्या ठिकाणी शतक ठोकलं आहे. २००५-०६ साली इंग्लंड संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थच्या मैदानावर कुकने शतकी खेळी केली होती. यानंतर २०१०-११ च्या हंगामात अॅशेस मालिकेत कुकने ब्रिस्बेन, अॅडीलेड आणि सिडनी या तिन्ही मैदानावर शतक ठोकलं. यानंतर मेलबर्न कसोटीत शतक झळकावत कुकने या अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. याआधी भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांना हा करिष्मा साधला होता.

पहिल्या डावात सलामीला फलंदाजीला येऊन २४४ धावांची नाबाद खेळी करणारा कुक १० विकेट डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहिला. या निकषाला क्रिकेटमध्ये ‘Carrying his Bat’ असं म्हणतात. कुकने २४४ धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नर यांचा २२३* धावांचा विक्रम मोडला. १९७२ साली किंग्जस्टनच्या मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना टर्नर यांनी हा विक्रम केला होता. गेले ४५ वर्ष हा विक्रम त्यांच्या नावावर कायम होता, अखेर कुकने बहारदार खेळी करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.