पॅरिस : प्रदीर्घ काळ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची आस बाळगलेला जर्मनीचा ॲलेक्झांडर झ्वेरेव फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. झ्वेरेवने शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत याकुब मेन्सिकचा ७-५, ६-२, ३-६, ६-३ असा पराभव केला. आता पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी त्याची इटलीच्या फ्लाविओ कोबोलीशी गाठ पडेल.

झ्वेरेव आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचूनही जेतेपदापासून वंचित राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत कार्लोस अल्कराझकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. फ्लाविओ कोबोली आणि माटेओ अर्नाल्डी यांच्यातील दुसरी उपांत्य लढत झालीच नाही. कोबोली कोर्टवर आला, पण अर्नाल्डीने विषाणू संसर्गामुळे सामन्यातून माघार घेतली. कोबोलीला पुढे चाल देण्यात आली.

अल्कराझची अनुपस्थिती आणि यानिक सिन्नेर, नोव्हाक जोकोविचचा याआधीच झालेला पराभव यामुळे आता झ्वेरेवला कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. ‘‘ही ग्रँडस्लॅम स्पर्धा माझ्यासाठी आजपर्यंतची सर्वोत्तम आहे. सर्वकाही ठरल्याप्रमाणे होत आहे. प्रतिस्पर्धी कितीही चांगला खेळ करत असला, तरी मी त्यांचे आव्हान परतवून लावत आहे. रविवारी आणखी एक सर्वोत्तम सामना खेळेन,’’ असे झ्वेरेव म्हणाला.

उपांत्य फेरीत पहिल्या गेममध्ये अकराव्या गेमला मिळालेली ब्रेकची संधी साधून झ्वेरेवने आघाडी घेतली. दुसर्‍या सेटमध्ये झ्वेरेवने दोन वेळा ब्रेकची संधी साधली आणि आपल्या स्व्हिहसवर केवळ चार गुण गमावले. इतक्या वर्चस्वासह त्याने दुसरा सेट जिंकला. मानेच्या दुखापतीवर मात करून मेन्सिकने तिसरा सेट जिंकला. मग चौथ्या सेटमध्ये झ्वेरेवने सहाव्या गेमला ब्रेकची संधी साधत ४-२ अशी आघाडी घेतली आणि नंतर संयमाने खेळावर नियंत्रण राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.

आंद्रीवा-च्वालिन्सका आज आमनेसामने

फ्रेंच स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम लढत क्रमवारीत आठव्या स्थानावरील मीरा आंद्रीवा आणि ११४व्या स्थानावरील माया च्वालिन्स्का या खेळाडूंमध्ये आज रंगणार आहे. च्वालिन्स्काने पात्रता फेरीतून येत अंतिम लढतीपर्यंत मजल मारली आहे. आक्रमकता ही आंद्रीवाची मुख्य ताकद आहे.