प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने सज्ज झालेल्या सायना नेहवालने विजयी सलामी नोंदवली. सातव्या मानांकित सायनाने स्कॉटलंडच्या किरस्टी गिलमूरवर २१-१५, २१-६ असा विजय मिळवला. सायनाने एकीकडे अभियानाची विजयाने सुरुवात केली, मात्र पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यासह ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान सलामीच्या लढतीतच संपुष्टात आले.
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर तंदुरुस्त सायनाने पहिल्या गेममध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. दमदार स्मॅशेस आणि प्रदीर्घ रॅलींवर भर देत सायनाने ही आघाडी ११-७ अशी वाढवली. नेटजवळून सुरेख खेळ करताना सायनाने ही आघाडी वाढवत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने अफलातून खेळ करत ११-३ अशी दमदार आघाडी घेतली. झंझावाती खेळाच्या जोरावर सायनाने ही आघाडी सातत्याने वाढवत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
जपानच्या पाचव्या मानांकित केनिची टागोने कश्यपवर १४-२१, २१-१९, २१-१७ अशी मात केली. नेटजवळून सुरेख खेळ करत आणि शैलीदार फटक्यांच्या आधारे कश्यपने पहिला गेम नावावर केला, मात्र त्यानंतर टागोच्या आक्रमक खेळासमोर तो निष्प्रभ ठरला. जपानच्या केंटो मोमोटाने किदम्बी श्रीकांतवर २१-११, २१-१५ असा विजय मिळवला. चीनच्या जिन मा आणि युआटिंग तांगने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१५, २१-१७ अशी मात केली. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा-तरुण कोना जोडीचाही पराभव झाला. डेन्मार्कच्या जोअॅकिम फिश्चर नेल्सन-ख्रिस्तियना पेडरसेन जोडीने अश्विनी-तरुण जोडीवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. दरम्यान, मुंबईकर आनंद पवार, साईली राणे यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
सायनाची विजयी सलामी
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने सज्ज झालेल्या सायना नेहवालने विजयी सलामी नोंदवली.

First published on: 06-03-2014 at 07:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All england open fit again saina nehwal hungry to make impact