तब्बल १४६२ दिवसांनंतर मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवल्यानंतर काळ्या मोहऱ्यांसह खेळतानाही कल्पक चाली करू शकतो, याचाच प्रत्यय विश्वनाथन आनंदने घडवला. आनंदने कार्लसनला कडवी टक्कर देत k06जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या डावात बरोबरीत रोखले. त्यामुळे चौथ्या फेरीनंतर दोन्ही खेळाडूंना २-२ अशा गुणांवर समाधान मानावे लागले आहे.
तिसऱ्या डावातील स्पृहणीय विजयामुळे आनंदचा आत्मविश्वास उंचावला होता. ४०पेक्षा k05अधिक चालींपुढे आनंदला खेचत न्यायचे आणि त्याचे खेळावरील नियंत्रण सुटल्यानंतर विजय मिळवायचा, हे कार्लसनचे डावपेच आनंदने बुधवारी मोडीत काढले. डावाच्या शेवटच्या टप्प्यातही आपण चांगला खेळ करू शकतो, हे आनंदने दाखवून दिले. डावाच्या मध्यात दोघांनीही बरोबरी न पत्करता विजयासाठी प्रयत्न केले. पण चौथ्या फेरीतील ही लढत गमावण्यापेक्षा बरोबरीत समाधान मानणे उचित ठरेल, हे ओळखूनच कार्लसनने ४७व्या चालीला आनंदसमोर बरोबरीचा प्रस्ताव ठेवला. आनंदनेही धोका पत्करून विजय मिळविण्याऐवजी अध्र्या गुणावर समाधान मानले.
पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना कार्लसनने राजापुढील प्याद्याने डावाची सुरुवात केली. पाचव्या चालीला त्याने कॅसलिंग करत राजा सुरक्षित केला. दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना आनंदकडून काही अक्षम्य चुका झाल्या होत्या. त्यामुळे आनंदने या डावात अशा चुका टाळल्या. ११व्या चालीला आनंदनेही कॅसलिंग केले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे छोटे मोहरे घेत वेगवेगळे डावपेच करण्याचा प्रयत्न केला. २३व्या चालीला दोघांकडे प्रत्येकी वजीर, एक हत्ती, दोन उंट, एक घोडा व पाच प्यादी अशी स्थिती होती. खेळाची व्यूहरचना कार्लसनसाठी थोडीशी अनुकूल होती, मात्र वेळेच्या बाबत आनंद वरचढ होता. ३४व्या चालीला आनंदने थोडा वेळ घेतला. त्याने आपले एक प्यादे पुढे नेत कार्लसनवर दडपण आणले. वजिरा-वजिरी झाल्यास आनंदला फायदा नव्हता, कारण त्याची दोन प्यादी खूप विस्कळित होती.
आनंदचे एक प्यादे वजीर होऊ शकते, या दडपणाखाली कार्लसनने आनंदच्या राजाला शह देण्यावर भर दिला. त्याने एक प्यादे जिंकले, मात्र आनंदने त्याचे एक प्यादे घेत स्थिती समान केली. या वेळी वजिरावजिरी झाल्यास आनंदला थोडा फायदा होऊ शकत होता. त्यामुळे कार्लसनने पुन्हा-पुन्हा त्याच चाली करत बरोबरीवर भर दिला. आनंदने ही बरोबरी समाधानाने मान्य केली. या बरोबरीत आनंदचीच बाजू वरचढ होती. ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुवारी विश्रांतीचा दिवस असल्यामुळे दोन्ही खेळाडूंना गृहपाठ करण्याची संधी मिळणार आहे.