इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, विंडीजकडून आव्हान अपेक्षित

न्यूयॉर्क : अमेरिकेत क्रिकेटच्या प्रसाराचे बीज रोवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला उद्या, रविवारपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीकडेच सर्वांचे लक्ष असणार आहे. २०१३च्या चॅम्पियन्स करंडकानंतर भारताला ‘आयसीसी’ची स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता ही प्रतीक्षा संपवण्याचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा प्रयत्न असेल. या स्पर्धेमार्फत अमेरिकेचा संघ क्रिकेट विश्वचषकात पदार्पण करणार आहे.

यंदाच्या स्पर्धेतही जेतेपदासाठी तेच दावेदार असतील, तारांकित खेळाडूही तेच असतील, काही संघांवर जेतेपदाच्या अगदी जवळ येऊन पुन्हा रिकाम्या हातानेच मायदेशी परतण्याची वेळ येईल, तसेच काही नवे संघ धक्कादायक निकाल नोंदवण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्या गोष्टी पूर्वीप्रमाणेच असल्या, तर यंदा एक गोष्ट वेगळी असेल, ती म्हणजे विश्वचषक क्रिकेटचे अमेरिकेत पदार्पण. येथे मूळ भारत आणि पाकिस्तानच्या असलेल्या व्यक्तींची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे येथे क्रिकेटचा अद्याप फारसा प्रसार झाला नाही, हेच नवल. मात्र, आता रोहित शर्मा, विराट कोहली, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर, बाबर आझम, केन विल्यम्सन, क्विंटन डिकॉक, कगिसो रबाडा यांसारख्या तारांकित क्रिकेटपटूंच्या उपस्थितीमुळे अमेरिकेतील क्रिकेटला वेगळीच उभारी मिळणार आहे.

हेही वाचा >>> आधी गर्दी स्थानकात, नंतर रस्त्यावर!; ब्लॉकमुळे अनेक आस्थापनांकडून कार्यालयांच्या वेळेत बदल; प्रवाशांच्या अडचणीत भर

इंग्लंडचा संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरेल. २०२२मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने जेतेपद पटकावले होते. आता ते राखण्याचा त्यांना मानस असेल. त्यांना भारतासह ऑस्ट्रेलिया, सह-यजमान वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांसारख्या संघांकडून आव्हान मिळणे अपेक्षित आहे. त्याच वेळी अफगाणिस्तान, नेदरलँड्स आणि आयर्लंड यांसारखे संघही धक्कादायक निकाल नोंदवण्यात सक्षम आहेत. त्यामुळे या स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

यंदाची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा २९ दिवस चालणार असून यात एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेला साखळी सामन्यांनी सुरुवात होईल. यात २० संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ‘सुपर एट’ म्हणजेच अव्वल आठ संघाच्या फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर २७ जूनला उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील, तर २९ जूनला अंतिम सामना रंगेल.

एकूण ५५ पैकी १६ सामने अमेरिकेत होणार आहेत, तर ३९ सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जातील. अमेरिकेला केवळ साखळी सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतून अमेरिका आणि युगांडा हे संघ विश्वचषकात पदार्पण करतील.

अमेरिकेची कॅनडाशी सलामी

यजमान अमेरिका आणि शेजारी कॅनडा यांच्यात भारतीय वेळेनुसार, रविवारी पहाटे ६ वाजता ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीचा सामना रंगणार आहे. अमेरिकेच्या संघात सौरभ नेत्रावळकर, हरमीत सिंग, मिलिंद कुमार आणि कर्णधार मोनांक पटेलसह अन्य काही मूळचे भारतीय असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या संघाला भारतीयांकडून चांगला पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात १८४४ मध्ये पहिला सामना खेळला गेला होता. अमेरिकेला कॅनडानंतर पाकिस्तान (६ जून), भारत (१२ जून) आणि आयर्लंड (१४ जून) यांच्याशी साखळी सामने खेळायचे आहेत.

गटवारी

●अ : अमेरिका, कॅनडा, भारत, पाकिस्तान, आयर्लंड.

●ब : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नामिबिया, ओमान, स्कॉटलंड.

●क : अफगाणिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, युगांडा, पापुआ न्यू गिनी.

●ड : दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, नेदरलँड्स.