दुबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या खांद्याला झालेली दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी त्याचा विचार करायचा की नाही, याबाबात अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन घेईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या लढतीत हार्दिकने ८ चेंडूंत ११ धावा केल्या. फलंदाजीदरम्यान उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने हार्दिक क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला नाही. त्यामुळे हार्दिकच्या संघातील स्थानाबाबत चर्चा रंगत आहेत.

त्याच्याऐवजी इशान किशनला संधी द्यावी, अशी मागणी काही चाहते करत आहेत. तर काहींनी अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याच्या विचाराने हार्दिकच्या जागी शार्दूल ठाकूर अथवा रविचंद्रन अश्विनला खेळवावे, असे सुचवले आहे. हार्दिकने ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामात एकदाही गोलंदाजी केली नाही. त्याशिवाय सराव लढतीतही त्याने गोलंदाजी करण्याचे टाळले.

‘‘हार्दिकच्या खांद्याची चाचणी करण्यात आली असून त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी अद्याप पाच दिवस शिल्लक असल्याने त्याला पुरेशी विश्रांतीसुद्धा मिळत आहे. मात्र सरावादरम्यान त्याची तंदुरुस्ती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

हार्दिक, भुवनेश्वरसाठी अखेरची संधी -ब्रेट ली

नवी दिल्ली : भारत अद्यापही ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र त्यांनी हार्दिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन संघातील स्थानाविषयी विचार करण्याची गरज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने व्यक्त केले आहे. ‘‘भुवनेश्वरने गोलंदाजीचा वेग वाढवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हार्दिकही गोलंदाजी करणार नसेल, तर फक्त फलंदाजीच्या बळावर त्याचे स्थान टिकणे कठीण आहे. न्यूझीलंडविरुद्धची लढत या दोघांसाठी या विश्वचषकातील अखेरची लढत ठरू शकते,’’ असे ब्रेट ली म्हणाला.

फग्र्युसनची माघार

शारजा : न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फग्र्युसनला पायाच्या दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी अ‍ॅडम मिल्नेचा न्यूझीलंडच्या १५ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. सोमवारी सरावादरम्यान फग्र्युसनला दुखापत झाली. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला मुकला. परंतु भारताविरुद्धच्या लढतीपर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी आशा होती.