देशातील सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित

करोनाचा फटका भारतातील अन्य स्पर्धानाही बसला आहे.

संग्रहित छायाचित्र

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आय-लीगसह देशातील सर्व फुटबॉल स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. रविवारपासून हा नियम लागू होईल. ‘‘आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार तसेच अनेक राज्य सरकारने करोनाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ‘एआयएफएफ’च्या मान्यतेखाली होणाऱ्या सर्व स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात

आल्या आहेत. ‘एआयएफएफ’ लोकांचे आरोग्य जपण्यासाठी कटिबद्ध आहे. याबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाहीत. त्यामुळेच देशभरातील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही स्पर्धाचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे ‘एआयएफएफ’ने आपल्या पत्रकात म्हटले आहे. या निर्णयाचा फटका आय-लीग, हिरो दुसरी विभागीय स्पर्धा, हिरो युवा लीग, गोल्डन बेबी लीग तसेच राष्ट्रीय स्पर्धाना बसणार आहे. इंडियन सुपर फुटबॉल लीगची अंतिम फेरी बंद दाराआड होणार आहे.

जर्मनी वि. इटली सामना रद्द

बर्लिन : जर्मनी आणि इटली यांच्यात ३१ मार्च रोजी न्यूरेमबर्ग येथे होणारा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे. बवारिया भागात १०० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश काढण्यात आले आहेत. हा सामना बंद दाराआड खेळवण्यात आला तरी संघातील खेळाडू, साहाय्यक प्रशिक्षक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची संख्या १०० पेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे, असे जर्मन फुटबॉल महासंघाकडून कळवण्यात आले. जर्मनी संघ २६ मार्च रोजी माद्रिदविरुद्ध स्पेनमध्ये खेळणार आहे, पण या सामन्याच्या आयोजनाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही.

सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने लांबणीवर

पॅरिस : मार्च आणि एप्रिल महिन्यांत होणारे सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने लांबणीवर टाकण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) केली आहे. आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील २०२२ फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने पुढे ढकलण्यात आले असून लवकरच या सामन्यांच्या नव्या तारखा ठरवण्यात येतील, असेही  फिफाकडून सांगण्यात आले. मात्र सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय हा सर्वस्वी क्लब, संयोजक अथवा संलग्न सदस्य मंडळांचा असेल.

बुंडेसलीगामधील खेळाडूला करोनाची बाधा

बर्लिन : बुंडेसलीगामधील पॅडरबॉर्न या संघातील फुटबॉलपटूला करोनाची बाधा झाली आहे. २० वर्षीय लुका किलियन असे त्याचे नाव आहे. त्याच्या सर्व सहकाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ‘‘किलियनशी संपर्कात असलेल्या प्रत्येकाची ५ मार्चपासून नित्यनेमाने वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या सर्वाना इतरांपासूून किमान २ किलोमीटर अंतर राखण्यास सांगण्यात आले आहे. सर्वाची प्रकृती स्थिर आहे,’’ असे पॅडरबॉर्न क्लबने म्हटले आहे.

भारतातील अन्य स्पर्धानाही फटका

करोनाचा फटका आता भारतातील अन्य स्पर्धानाही बसला आहे.

*  भोपाळ येथे ६ ते ८ एप्रिलदरम्यान रंगणारी फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

*  नवी दिल्ली येथे १९ ते २२ मार्चदरम्यान होणारी इंडिया खुली गोल्फ स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

*  सर्व देशांतर्गत टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून सर्व राष्ट्रीय आणि राज्य पॅरा स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

*  नवी दिल्लीत १५ ते २५ मार्चदरम्यान रंगणारी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक रायफल, पिस्तूल आणि शॉटगन स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द

नवी दिल्ली : करोनाच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) १६ मार्चपासूनच्या सर्व स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्विस खुली, इंडिया खुली, ऑरलेन्स मास्टर्स, मलेशिया खुली,

सिंगापूर खुली या महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही महत्त्वाची स्पर्धा आयोजित करू नये, असे ‘बीडब्ल्यूएफ’ने म्हटले आहे. इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीत २४ ते २९ मार्चदरम्यान खेळवण्यात येणार होती.

बोस्टन मॅरेथॉन १४ सप्टेंबपर्यंत स्थगित

बोस्टन : जगातील सर्वाधिक लोकप्रिय मॅरेथॉन असा नावलौकिक मिळवणारी बोस्टन मॅरेथॉन शर्यत करोनाच्या भीतीमुळे १४ सप्टेंबपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बोस्टनचे महापौर मार्टी वॉल्श यांनी ही घोषणा केली. सात शहरांमधून जाणारी ही मॅरेथॉन २० एप्रिल रोजी होणार होती. मात्र वाढत्या दबावामुळे ही शर्यत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. १८९७ मध्ये सुरू झालेली ही मॅरेथॉन फक्त १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आयोजकांवर ही मॅरेथॉन रद्द करण्याची वेळ उद्भवलेली नाही. या मॅरेथॉनसह रोम मॅरेथॉन रद्द करण्यात आली असून ५ एप्रिलला होणारी पॅरिस मॅरेथॉन १८ ऑक्टोबपर्यंत आणि १५ मार्च रोजी होणारी बार्सिलोना मॅरेथॉन २५ ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रो हॉकी लीगचे सामने १५ एप्रिलपर्यंत स्थगित

लॉसान : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) प्रो हॉकी लीगचे सामने १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. ‘‘सर्व सहभागी संघांनी प्रो हॉकी लीगमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे ‘एफआयएच’ने १५ एप्रिलपर्यंतचे सामने स्थगित केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याच्या आवाहनामुळे आता एप्रिलच्या मध्यानंतरच आणि ऑलिम्पिकच्या आधी सर्व सामने खेळवण्यात येतील,’’ असे ‘एफआयएच’चे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल यांनी म्हटले आहे. भारताचा पुढील सामना २५ आणि २६ एप्रिल रोजी जर्मनीविरुद्ध बर्लिन येथे होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All sports contests in the country postponed abn