Michael Vaughan On ICC: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटूने आयसीसीवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे. भारत आणि श्रीलंकेत टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरू असताना इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बरेचशे खेळाडू आपल्या मायदेशी जाऊ शकलेले नाहीत. यावरून मायकल वॉन यांनी आयसीसीवर आरोप केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्या अहमदाबादमध्ये आहेत. तर दुसरीकडे सुपर ८ मधून बाहेर पडलेले वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू अजूनही आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीत. तर दुसरीकडे सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या इंग्लंड संघातील खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. यावरून मायकल वॉन यांनी आयसीसीवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे.
मायकल वॉन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कुठल्याही मुद्द्यावर आपलं मत मांडण्यासाठी ते सोशल मीडियाचा सहारा घेत असतात. यावेळी देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, गुरुवारी स्पर्धेतून बाहेर पडलेल्या इंग्लंड संघाला शनिवारी घरी पाठवलं. पण वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू जे इंग्लंडच्या आधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ते अजूनही भारतातच अडकून आहेत. असं वाटतंय इथे पावरचा चुकीचा वापर केला जात आहे.
मायकल वॉन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “इंग्लंडचा संघ गुरुवारी स्पर्धेतून बाहेर पडला आणि आज चार्टर्ड फ्लाईटने घरी जात आहे. वेस्ट इंडिजचा संघ गेल्या रविवारी स्पर्धेतून बाहेर पडला आहे, पण खेळाडू अजूनही कोलकात्यात आहेत. दक्षिण आफ्रिकेचीही अशीच काहीशी स्थिती आहे. इथे पावरचा चुकीचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत सर्व संघांना समान वागणूक मिळायला हवी.”
