नवी दिल्ली : भारताच्या अल्फिया पठाणने माजी विश्वविजेत्या कझाकस्तानच्या लज्जत कुंगेबायेव्हाला पराभवाचा धक्का देत एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अल्फियाला २०२१च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कझाकस्तानची राजधानी नूर-सुलतान येथे झालेल्या या स्पर्धेतील ८१ किलोवरील वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या अल्फियाने २०१६च्या जागतिक स्पर्धेतील विजेत्या कुंगेबायेव्हावर ५-० अशी सहज मात केली. अल्फियाने युवा जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. एलोर्डा चषक स्पर्धेच्या माध्यमातून तिने वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदार्पण केले.

तसेच ४८ किलो वजनी गटातील दोन भारतीय बॉक्सिंगपटूंमध्ये झालेल्या अंतिम लढतीत गितिकाने कलैवानी श्रीनिवासनचा ४-१ असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत भारताच्या जमुना बोरोने उझबेकिस्तानच्या निगिना उक्तामोव्हाकडून ०-५ अशी हार पत्करली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे ज्योती गुलिया (५२ किलो), साक्षी (५४ किलो), सोनिया (५७ किलो), नीमा (६३ किलो), ललिता (७० किलो) आणि बबिता बिश्त (९२ किलो) यांनी महिलांमध्ये, तर कुलदीप कुमार (४८ किलो), अनंत चोपडे

(५४ किलो), सचिन (५७ किलो) आणि जुग्नू (९२ किलो) यांनी पुरुषांमध्ये कांस्यपदक मिळवले.