Alysa Healy Last odi Inning Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये तिसरा वनडे सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हिलीने अखेरच्या सामन्यात दीडशतकी करत अधिक संस्मरणीय केला. शतकी खेळीसह हिलीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या खेळीसह तिने विश्वविक्रम देखील आपल्या नावे केला आहे आणि भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने अवघ्या ९८ चेंडूत १५८ धावांची तुफानी खेळी साकारली. या डावात तिने तब्बल २७ चौकार आणि २ षटकार लगावले आणि तिचा स्ट्राइक रेट १६१.२२ इतका होता. याच सामन्यात बेथ मुनीने देखील शतक झळकावलं आणि ऑस्ट्रेलियाने तब्बल ४०९ धावांची डोंगराएवढी मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलिया महिला संघाने घरच्या मैदानावरील सर्वाेच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम रचला. तर टीम इंडियाविरूद्ध कोणत्याही संघाने उभारलेली ही दुसरी सर्वाेच्च धावसंख्या आहे.
एलिसा हिलीने इतिहास घडवला
एलिसा हिलीची १५८ धावांची खेळी ही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही खेळाडूची आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. गेली दोन दशकं हा विक्रम इंग्लंडच्या दिग्गज क्लेरी टेलर यांच्या नावावर होता; त्यांनी लॉर्ड्सवर केलेली खेळी दीर्घकाळ अव्वल राहिली होती. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध १५०+ धावा करणाऱ्या हीली आणि टेलर या एकमेव फलंदाज ठरल्या आहेत.
भारताविरुद्ध एका डावात फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा (महिला क्रिकेट)
एलिसा हिली – १५८ धावा – होबार्ट, २०२६
क्लेरी टेलर – १५६ धावा – लॉर्ड्स, २००६
एलिसा हिली – १४२ धावा – विशाखापट्टणम, २०२५
यासोबतच, हीली भारताविरुद्ध तीन एकदिवसीय शतकं झळकावणारी पहिलीच फलंदाज ठरली. मात्र बेथ मुनी या शतकामुळे या यादीत अव्वल स्थानी पोहोचली. याआधी अॅलेक्स ब्लॅकवेल, सुझी बेट्स, शार्लोट एडवर्ड्स, फोबी लिचफिल्ड, करेन रोल्टन, जॉर्जिया वॉल आणि लॉरा वोल्व्हार्ड यांनी भारताविरुद्ध दोन शतकं नोंदवली आहेत.
हीलीने होबार्टमधील महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा दशकभर जुना विक्रमही मोडला. हा विक्रम भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या नावावर होता. त्यानंतर मुनीनेही मानधनाला मागे टाकलं.
होबार्ट येथील महिला एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
एलिसा हिली – १५८ धावा, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०२६
बेथ मुनी – १०६ धावा, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०२६
स्मृती मानधना – १०३ धावा , भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०१६
या मैदानावर आतापर्यंत १६ एकदिवसीय सामने खेळवले गेले असून, केवळ पाच खेळाडूंना शतक झळकावता आलं आहे. आजच्या सामन्यातील दोन्ही शतकवीरांचा त्यात समावेश आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये मात्र एडम गिलक्रिस्ट (१७२) आणि तिलकरित्ने दिलशान (१६०) यांच्याच धावा हीलीपेक्षा अधिक आहेत.
