Australia Captain Alyssa Healy Announces Retirement: यंदा पुरूषांच्या टी-२० विश्वचषकासह महिलांचा विश्वचषकदेखील खेळवला जाणार आहे. महिलांचा टी-२० विश्वचषक जून-जुलैमध्ये खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार व आठ वेळची वर्ल्डकप विजेती खेळाडू एलिसा हिलीने अचानक निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या मल्टी-फॉरमॅट मालिकेनंतर एलिसा हिली क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. २०२३ च्या अखेरीस मेग लॅनिंगच्या जागी हिलीला पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी ऑस्ट्रेलियाला सुरू करता यावी म्हणून ती भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही. पण ती एकदिवसीय सामने खेळेल आणि नंतर तिच्या कारकिर्दीचा शेवट ११ व्या कसोटी सामन्याने करेल, जो ६ ते ९ मार्च दरम्यान वाका येथे एक डे-नाईट सामना असेल.
एलिसा हिलीने सांगितलं निवृत्तीमागचं कारण
ऑस्ट्रेलियन कर्णधार हिलीने पोडकास्टमध्ये तिच्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं की, “हा निर्णय मी पॉडकास्टसाठीच राखून ठेवला होता, कारण अलीकडच्या काळात मला सर्वाधिक आनंद देणारं हे काम ठरलं आहे. आज अधिकृतपणे हे जाहीर करत आहे. भारताविरूद्ध मालिकेनंतर मी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. हा निर्णय सोपा नव्हता, पण कधीतरी तो घ्यावाच लागतो,” असं हिलीने ‘विलो टॉक क्रिकेट पॉडकास्ट’मध्ये सांगितलं.
“हा निर्णय बराच काळ मनात होता. मागील काही वर्षे शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक थकवणारी ठरली, काही दुखापती झाल्या. पुन्हा पुन्हा स्वतःला झोकून द्यावं लागतं, पण ती ऊर्जा आणि ताकद हळूहळू कमी होत चालली होती, त्यामुळे पुन्हा मैदानात उतरणं अधिक कठीण होत गेलं,” निवृत्तीमागचं कारण सांगत हिलीने सांगितलं.
तिने पुढे सांगितलं की, भारताविरुद्ध मायदेशात खेळून कारकीर्द संपवण्याची संधी मिळणं हे तिच्यासाठी खास आहे. “भारताविरुद्धची मालिका ही आमच्यासाठी कॅलेंडरमधील सर्वात मोठ्या मालिकांपैकी एक आहे आणि ती मल्टी-फॉरमॅट मालिका आहे. माझ्या सहकाऱ्यांबरोबर आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मायदेशात अखेरचं खेळणं, हा खूपच सुंदर आणि योग्य शेवट ठरेल.”
“भारतामध्ये विश्वचषक खेळून निवृत्ती घेता आली असती तर ते नक्कीच छान झालं असतं, पण मायदेशात कारकीर्द संपवणं हेही तितकंच खास आणि अविस्मरणीय ठरणार आहे,” असं शेवटी तिने म्हटलं.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ फेब्रुवारीपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसह सुरू होणार आहे, त्यानंतर पर्थमधील वाका येथे तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळवला जाईल, जो हिलीच्या शानदार कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. हिलीने १२३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये सात शतकांसह ३,५६३ धावा केल्या आहेत आणि १६२ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एका शतकासह ३,०५४ धावा केल्या आहेत. तिने १० कसोटी सामने देखील खेळले आहेत.
२०२० च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात ती सामनावीर ठरली होती, जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. २०२२ च्या एकदिवसीय विश्वचषकातही ती सामनावीर होती, जेव्हा त्यांनी इंग्लंडला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.

