ऑस्ट्रेलियाची महान खेळाडू एलिसा हिलीने शेवटच्या वनडेत मॅरेथॉन दीडशतकी खेळी साकारली. हिलीच्या बरोबरीने बेथ मूनी हिनेही शतकी खेळी केली. या दोघींच्या तडाखेबंद खेळींच्या बळावर ऑस्ट्रेलियाने चारशेपार धावसंख्या रचली.

भारताविरुद्धची मालिका कारकिर्दीतली शेवटची असेल असं हिलीने जाहीर केलं होतं. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने हिलीला गार्ड ऑफ हॉनर दिला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाच्या वतीने हिलीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेवटच्या लढतीत कर्णधारपदही भूषवणाऱ्या हिलीने खणखणीत अशी फटकेबाजी केली. होबार्टच्या बेलराईल ओव्हलच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर हिलीसह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी फटकेबाजीचा आनंद लुटला.हिलीने जॉर्जिआ वॉलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ९१ चेंडूत १०४ धावांची भागीदारी केली. ६२ धावा करून वॉल बाद झाली. यानंतर बेथ मूनीने हिलीला साथ दिली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत १४५ धावांची दमदार भागीदारी केली. यादरम्यान हिलीने वनडेतलं आठवं शतक झळकावलं.

शतकानंतरही हिलीने फटकेबाजी सुरुच ठेवली. स्नेह राणाने तिला बाद केलं. हिलीने २७ चौकार आणि २ षटकारांसह १५८ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. हिली बाद झाल्यानंतर मूनीने सूत्रं हाती घेतली. मालिकेत उत्तम फॉर्मात असणाऱ्या मूनीनेही शतक पूर्ण केलं. मूनीने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०८ धावांची खेळी केली. निकोल कॅरेने १५ चेंडूत ३४ धावा चोपल्या. हिली-मूनीच्या बॅटचा तडाखा भारतीय गोलंदाजांना सहन करावा लागला. युवा श्री चरणीच्या १० षटकात १०६ धावा लुटल्या गेल्या. वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीर दीप्ती शर्माने १० षटकात ९० धावा दिल्या.