Amanpreet Singh Gill death news: आयपीएल २०२६ हंगामात सध्याच्या घडीला एकापेक्षा एक चुरशीचे सामने खेळवले जात आहे. यादरम्यानच एक धक्कादायक व दुःखद बातमीने संपूर्ण भारतीय क्रिकेट जगताला हादरवून सोडलं आहे. विराट कोहलीसोबत १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला पंजाबचा माजी वेगवान गोलंदाज अमनप्रीत सिंग गिल याचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झालं आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली.

पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्याचा फोटो शेअर करत ही वाईट बातमी शेअर केली. पंजाब क्रिकेट असोसिएशनने अमनप्रीत सिंग गिल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीसीएने सोशल मीडियावर लिहिलं की, “पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून पंजाबचे माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समितीचे सदस्य अमनप्रीत सिंग गिल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी भारत अंडर-१९, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करताना क्रिकेटसाठी मोठ्या समर्पणाने आणि जिद्दीने सेवा दिली.”

“पुढे लिहिलं, शोकाकुल कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या कठीण प्रसंगी कुटुंबाला धैर्य देवो.” अमनप्रीत सिंग गिल हा उजव्या हाताचा फलंदाज आणि वेगवान गोलंदाज होता.

चंदीगडमध्ये जन्मलेल्या अमनप्रीत सिंग गिलने पंजाब क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलं. २००७ मध्ये श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील तिरंगी मालिकेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केलं, जिथे तो विराट कोहली आणि मनीष पांडे यांसारख्या खेळाडूंसोबत खेळला. त्या मालिकेत, अमनप्रीतने पाच सामन्यांमध्ये नऊ बळी घेतले, ज्यात अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध सामना जिंकून देणाऱ्या गोलंदाजीचा समावेश होता.

अमनप्रीतने पंजाबसाठी सहा प्रथम-श्रेणी सामनेही खेळले. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात तो किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) संघाचा भाग होता, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. नंतर त्याने पंजाब वरिष्ठ निवड समितीचे सदस्य म्हणून काम केलं.