पुरुषांमध्ये फेडरर, नदालचा संघर्षपूर्ण विजय; महिलांमध्ये प्लिस्कोव्हा, ओस्टापेन्को तिसऱ्या फेरीत

माजी विजेत्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर कॅरोलिन वोझ्नियाकी ही स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आलेली महिला एकेरीच्या मानांकन यादीतील अव्वल आठ खेळाडूंपैकी पाचवी खेळाडू ठरली आहे.

फेडररने न्यूयॉर्कच्या आर्थर अ‍ॅश स्टेडियमवरील आपल्या कारकीर्दीतील ८०वा विजय नोंदवला, परंतु सलग दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला पाच सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. अखेरीस फेडररने रशियाच्या मिखाईल यॉझनीचा ६-१, ६-७ (३/७), ४-६, ६-४, ६-२ असा पराभव केला. ३६ वर्षीय फेडरर आणि यॉझनी यांच्यात तसे फक्त एका वर्षांचे अंतर आहे. परंतु आतापर्यंत दोघांमध्ये झालेल्या १७ पैकी १७ लढती फेडररने जिंकल्या आहेत.

पाच वेळा अमेरिकन विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या फेडररची पुढील फेरीत स्पेनच्या ३५ वर्षीय फेलिसियानो लोपेझशी गाठ पडणार आहे. लोपेझविरुद्धही त्याची कामगिरी १२-० अशी वर्चस्वपूर्ण आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या नदालने क्रमवारीत १२१ व्या स्थानावर असलेल्या जपानच्या टॅरो डॅनियलचा ४-६, ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला. डॅनियलने २०१० आणि २०१३मध्ये अमेरिकन विजेत्या अव्वल मानांकित नदालला पहिल्या सेटमध्ये हरवले. जागतिक टेनिस विश्वातील अव्वल १० खेळाडूंना आपल्या कारकीर्दीत कधीही नमवू न शकलेल्या डॅनियलला त्यानंतर नदालचा सामना करणे आव्हानात्मक ठरले.

अँड्रे रुब्लेव्ह हा यंदाच्या स्पध्रेत तिसरी फेरी गाठणारा दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. त्याने बल्गेरियाच्या सातव्या मानांकित ग्रिगर दिमित्रोव्हचा ७-५, ७-६ (७/३), ६-३ असा पराभव केला. १९ वर्षीय रुब्लेव्ह हा जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानावर आहे. कॅनडाच्या १८ वर्षीय डेनिस शापोव्हालोव्हने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पध्रेची तिसरी फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या १९ वर्षीय टेलर फ्रिट्झला या दोघांचा कित्ता गिरवता आला नाही. ऑस्ट्रियाच्या सहाव्या मानांकित डॉमिनिक थिएमने फ्रिट्झला ६-४, ६-४, ४-६, ७-५ असे नामोहरम केले.

२००९मध्ये अमेरिकन विजेत्या २४व्या मानांकित ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने (अर्जेटिना) स्पेनच्या अ‍ॅड्रियन मेनेंडिझ-मॅसेरासचा ६-२, ६-३, ७-६ (७/३) असा पराभव केला. बेल्जियमच्या नवव्या मानांकित डेव्हिड गॉफिनने अर्जेटिनाच्या ग्युयडो पेल्लाचा ३-६, ७-६ (७/५), ६-७ (२/७), ७-६ (७/४), ६-३ असा पराभव केला. हा सामना चार तास आणि १२ मिनिटे चालला.

महिला एकेरीत रशियाच्या इकटेरिना माकारोव्हाने डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीला हरवले. माकारोव्हाने ६-२, ६-७ (५/७), ६-१ अशा फरकाने वोझ्नियाकीला पराभूत केले. याशिवाय २००४मध्ये अमेरिकन विजेत्या रशियाच्या आठव्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोवालाची वाटचालसुद्धा खंडित झाली. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाला गवसणी घालण्याचे तिचे स्वप्न यामुळे भंगले आहे. जपानच्या कुरुमी नाराने तिचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव केला. सिमोना हॅलेप, वोझ्नियाकी, गतविजेती अ‍ॅजेलिक कर्बर, जोहाना कोंटा यांच्यानंतर कुझ्नेत्सोव्हा ही अव्वल आठपैकी बाद होणारी पाचवी खेळाडू ठरली.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अमेरिकेच्या निकोली गिब्सला २-६, ६-३, ६-४ असे हरवले. युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने सलग तिसऱ्या वर्षी तिसरी फेरी गाठताना रशियाच्या एव्हगेनिया रॉडिनाला ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. याचप्रमाणे फ्रेंच विजेत्या लॅव्हियाच्या जेलिना ओस्टापेन्कोने रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाला ६-४, ६-४ असे सहज हरवले.

बोपण्णा, मिर्झा दुसऱ्या फेरीत

भारताचे दुहेरीमधील आघाडीचे टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत विजयी सलामी नोंदवली आहे.

पुरुष दुहेरीत पहिल्या सेटमध्ये झगडणाऱ्या बोपण्णा आणि पोबलो क्यूव्हास (उरुग्वे) जोडीने अमेरिकेच्या ब्रेडली क्लान आणि स्कॉट लिप्स्की जोडीचा १-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत बोपण्णा-क्यूव्हास जोडीची इटलीच्या सिमोन बोलेली आणि फॅबिओ फॉगनिनी जोडीशी गाठ पडणार आहे.

महिला दुहेरीत मिर्झाने तिची चिनी सहकारी शुआय पेंगसोबत खेळताना क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिक आणि डॉन्ना व्हेकिक जोडीचा ६-४, ६-१ असा ५५ मिनिटांच्या लढतीत पराभव केला. मिर्झा-पेंग जोडीची पुढील फेरीत स्लोव्हाकियाच्या याना केपेलोव्हा आणि मॅगडालेना रायबारिकोव्हा जोडीशी गाठ पडणार आहे.

महिलांमध्ये दुसऱ्या फेरीचा विक्रमी सामना

अमेरिकेची शेल्बी रॉजर्स आणि ऑस्ट्रेलियाची डॅरिया गॅव्हरिलोव्हा यांच्यातील लढतीने महिला एकेरीत सर्वाधिक वेळ चालणारा दुसऱ्या फेरीचा सामना असा विक्रम नोंदवला. तब्बल तीन तास आणि ३३ मिनिटे चाललेल्या सामन्यात रॉजर्सने २५व्या मानांकित गॅव्हरिलोव्हावर ७-६ (८/६), ४-६, ७-६ (७/५) असा विजय नोंदवला. दुसऱ्या फेरीचा याआधीचा विक्रम दोन वर्षांपूर्वी जोहाना कोंटा आणि गार्बिन मुगुरुझा यांच्या सामन्याने नोंदवला होता. तो सामना तीन तास आणि २३ मिनिटे रंगला होता.